esakal | Akola : सासऱ्याचा खून करणाऱ्या जावयाला जन्मठेप
sakal

बोलून बातमी शोधा

court

सासऱ्याचा खून करणाऱ्या जावयाला जन्मठेप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : मुलीला मारहाण करीत असलेल्या जावयाला अडविण्यासाठी गेलेल्या सासऱ्याचा खून करणाऱ्या जावई विशाल सहेदव गवई (रा. महात्मा फुले नगर, खदान) याला न्यायालयाने सोमवारी (ता.४) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीष डी बी.पतंग यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला. ही घटना मार्च २०१८ मध्ये खदान पोलिस स्टेशन अंतर्गत घडली होती.

घटनेची हकीकत अशी की, विशाल सहदेव गवईचे लग्न मृतक दिलीप गोंदुजी सावंग, रा. महात्मा फुले नगर, खदान यांची मुलगी किरण हिच्या सोबत झाला होता. आरोपी विशाल सहदेव गवई याच्या त्रासाला कंटाळून ती तिचे आई-वडिल यांच्या जवळ राहत होती. विशाल गवई हा सुध्दा त्यांच्या घरा जवळ राहत होता. ता. ९ मार्च २०१८ रोजी संध्याकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान गवईचे सासरे दिलीप सावंग त्यांची पत्नी रेखा दिलीप सावंग, मुलगी किरण विशाल गवई व इतर आजुबाजूचे लोक हजर असताना विशाल तिथे आला व त्याने त्याची पत्नी किरणच्या डोक्याचे केस धरून तिला ओढत त्याच्या घरापर्यंत नेले.

भांडन करून तिला मारहाण करत होता. त्यावेळी किरणचे वडिल तिथे आले व त्याला आवरण्याचा प्रयत्न करित असताना विशालने घरात जावून चाकू आणला व सासऱ्याच्या छाती व पोटात घाव मारले. म्हणून त्याच्या सासऱ्याला सरकारी दवाखान्यात घेवून गेले असता डाॅक्टरांनी ते मयत झाल्याचे सांगितले. मृतकाची पत्नीने जावई विशाल सहदेव गवई याच्या विरुध्द खदान पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानुसार कलम ३०२, ४९८-अ, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपास अधिकारी पोलिस निरीक्षक संतोष महल्ले व स.पो.नि. आर.जे. भारसाकळे यांनी तपास पूर्ण झाल्यावर न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. या प्रकरणामध्ये सरकार पक्षाने गुन्हा सिध्द होण्याकरिता एकूण नऊ साक्षीदार तपासले. न्यायालयाने विशालला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली व पाच हजार रुपयांचा दंड केला. दंड न भसल्यास एक वर्षाची आणखी सश्रम कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. या प्रकणात अतिरिक्त सरकारी वकील श्री शाम खोटरे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.

loading image
go to top