अकोला : स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जाहीर; राजकीय धुराळा सुरू

१० डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून, १४ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार
election
electionsakal

अकोला : विधान परिषदेच्या अकोला- वाशीम- बुलडाणा या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक मंगळवार, ता. ९ नोव्हेंबर रोजी जाहीर झाली. येत्या १० डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून, १४ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दर सहा वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीच्या निमित्ताने तिन्ही जिल्ह्यात राजकीय धुराळा सुरू झाला आहे. या निवडणुकीची आचारसंहिता तिन्ही जिल्ह्यात लागू झाली आहे. यावर्षी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत या मतदारसंघात बघावयास मिळणार आहे.

सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया करीत आहेत. त्यांचा विद्यमान कार्यकाळ ता. १ जानेवारी २०२२ रोजी संपत आहे. त्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक घेणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. अकोला- वाशीम-बुलडाणा या तीन जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका सदस्य, नगरपालिका, नगरपंचायत सदस्य आणि पंचायत समिती सभापती यांना मतदानाचा हक्क आहे.

सन २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत तिन्ही जिल्ह्यातील एकूण ७९० मतदार होते. त्यात अकोला येथील शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बजोरिया यांनी विजयाची ‘हॅट्‍ट्रिक’ साजरी केली होती. भाजपची शिवसेनेसोबत युती होती. बजोरिया यांनी राष्ट्रवादीचे रवी सपकाळ यांच्यावर मात केली होती. बजोरियांना ५१३ तर सपकाळ यांना २३९ मते मिळाली होती. राष्ट्रवादी व काँग्रेसने ही निवडणूक एकत्र लढविली होती.

election
ST महामंडळाकडून कारवाईला सुरूवात; 376 कर्मचाऱ्यांचं निलंबन!

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप सामना रंगणार

विधान परिषदच्या अकोला-वाशीम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत यावर्षी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना बघावयास मिळणार आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचे नाव निश्चित आहे. भाजपकडून बुलडाणा जिल्ह्यातील माजी आमदार चैनसुख संचेती यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय अकोल्यातील वसंत खंडेलवाल, विजय अग्रवाल, शेगाव येथील शरद अग्रवाल, वाशीम जिल्ह्यातील विजय जाधव यांचेही नाव चर्चेत आहे.

‘वंचित’ची तलवार म्यानच!

विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीने अद्याप कोणतीही तयारी केलेली नाही. या निवडणुकीसाठी वंचितची तलावार अद्याप म्यानच आहे. मात्र, ऐनवेळी वंचित निवडणुकीच्या रिंगणात उडी घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. बुलडाणा जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित व्यक्तीमत्व वंचितच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. वंचित बहुजन आघाडीकडे तिन्ही जिल्ह्यात मिळून १०० च्या जवळपास सदस्य असून, ते या निवडणुकीत निर्णायक भूमिकेत असतील.

दृष्टीक्षेपात मतदारसंघ

  • अकोला जिल्हा ः एक महानगरपालिका, पाच नगर परिषद, एक नगर पंचायत, सात पंचायत समिती सभापती

  • बुलडाणा जिल्हा ः ११ नगर परिषद, दोन नगर पंचायत, १३ पंचायत समिती सभापती

  • वाशीम जिल्हा ः चार नगर परिषद, दोन नगर पंचायत, सहा पंचायत समिती सभापती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com