
मकरसंक्रांतचा सण काही दिवसांवर येवून ठेपला आले. गेल्या पाच सहा वर्षांपासून राज्यात चिनी मांजाला बदी आहे. तरीही या मांजाची विक्री सुरू असते. या प्रकरणी प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नाही.
अकोला : मकर संक्रांतीला अजून दोन आठवड्यांचा अवकाश असला, तरी आकाशात पतंग दिसू लागले आहेत. यंदा पतंगप्रेमींची पसंती चायनामेड मांजाला आहे. शहरात सुमारे दोनशे लहान-मोठे पतंग विक्रेते आहेत. पतंग व मांजा तयार करणाऱ्या कारागिरांची संख्या मात्र घटली आहे. त्यामुळे बहुतेक दुकानदारांनी रेडिमेड पतंग व मांजा विक्रीसाठी ठेवला आहे. यंदा चीनच्या नाकेबंदीचा एक भाग म्हणून मोबाइल अप्लिकेशनसह अनेक वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र असे असले तरी पूर्वीपासूनच बंदी घालण्यात आलेला चिनी मांजा अद्यापही खुलेआम पद्धतीने कसा विकला जातो, दरवर्षी शेकडो अपघात होऊनही संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न नागरिक तसेच पक्षीमित्र उपस्थित करीत आहेत.
कोठून येते साहित्य
पतंग तयार करण्यासाठी लागणाऱ्या बांबूच्या कामट्या कोलकाता येथून, तर कागद मुंबईहून मागवण्यात येतो. विशिष्ट पदार्थ आणि काच लावून मांजा सुतवण्यासाठी किमान पंधरा मिनिटे लागतात. मात्र, या कामासाठी कारागीर मिळत नसल्याने शक्यतो रेडीमेड साहित्य मुंबई, सुरत आणि कोलकातसारख्या ठिकाणाहून मागविल्या जातो.
दहा रुपयापासून दोनशे रुपयांपर्यंत मिळतो मांजा
बॉम्बेटॉप, रॉकेट, चील, तसेच प्रिंटेड पतंगांचा समावेश असून ते अहमदाबाद येथून मागवण्यात आले आहेत. पतंगांच्या किंमती एक रुपयापासून आठ रुपयांपर्यंत आहेत. मांजाची किंमत १० पासून २०० रुपयांपर्यंत आहे. चायनामेड बंडलातील मांजाची लांबी २०० पासून दीड हजार मीटरपर्यंत असते. चायनामेड मांजाबरोबरच उत्तर प्रदेशातील बरेलीचा मांजाही बाजारात उपलब्ध आहे. देशी मांजापेक्षा जास्त टिकाऊ असल्याने पतंगप्रेमींनी चायनामेड मांजाला पसंती दिली आहे. देशी पतंग व मांजाला तुलनेत कमी मागणी आहे.
दरवर्षी कापल्या जातात अनेकांचे गळे
नायलॉनच्या घातक चायना मांजावर बंदी घातली असली तरी, बाजारामध्ये सर्रास चायना मांजाचे बंडल सहजरीत्या उपलब्ध होत आहे. या चायना मांजामुळे पक्षी तर जखमी होतातच, शिवाय लहान मुलांची बोटेसुद्धा कापली जातात. पतंग उडवताना, मांजा अनेकांच्या गळ्यात अडकल्यामुळे प्राण गमवावे लागले आहेत. अनेक दुचाकीस्वारांचा गतीमुळे क्षणात गळा कापल्या जाऊ शकतो. मांजामुळे चेहऱ्यालासुद्धा इजा होऊन, त्वचा कापली जाते.
जीव आहे तर उत्सव आहे
नॉयलॉन मांजामध्ये धातूच्या भुकटीचा वापर केला जात असल्याने, मांजाचा विद्युत तारांना स्पर्श झाल्यास त्यामुळे विजेचा धक्का बसू शकतो. उत्सव साजरा जरूर करावा; परंतु उत्सवाला अनुचित घटनेचे गालबोट लागता कामा नये. याबाबत पालक व मुलांनीसुद्धा खबदारी घेतली पाहिजे. पालकांनी मुलांना चायना मांजासह इतर कोणताही घातक मांजा घेऊन देऊन नये. बऱ्याचदा इमारतीच्या छतावर पतंग उडवताना तोल जाऊन अनेक मुले जखमी, मृत्युमुखीसुद्धा पडली आहेत. त्यामुळे पालकांनी अंतर्मुख होऊन विचार करावा आणि आपल्या मुलांचा आणि इतरांचाही जीव वाचवावा.
विक्री करणे गुन्हा, पोलिसांनी केली कारवाई
जुने शहरातील पोळा चौकात सोमवारी (ता.१) छापा टाकून २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर मंगळवार (ता.२) खडकी परिसरात ४५ वर्षीय व्यावसायिकास अटक करून त्याकडून जवळपास २६ हजार ७०० रुपयांचे तीस बंडल जप्त करण्यात आले आहेत.
संक्रांतीनिमित्त संपूर्ण आकाश पतंगमय होते; पण याचा खरा त्रास होतो मुक्तसंचार करणाऱ्या पक्ष्यांना. गेल्या काही वर्षांमध्ये घातक मांजामुळे शेकडो पक्ष्यांचे जीव गेले आहेत. आकाशात होणाऱ्या पतंगाच्या गर्दीमुळे पक्ष्यांना मोठी दुखापत होत आहे. अशा प्रकारचा मांजा नागरिकांनीही वापरू नये. आपल्या निदर्शनास असे विक्रेते आढळल्यास त्वरीत पोलिसांशी संपर्क साधावा.
- अमाेल सावंत, पक्षीमित्र, अकोला.
(संपादन - विवेक मेतकर)