
संयुक्त महाराष्ट्र मिळविण्यासाठी सर्वपक्षीय महाराष्ट्रवादी नेते हे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या झेंडयाखाली एकवटले असता काँग्रेसमध्ये शिल्लक राहिलेल्या महाराष्ट्रवादींपैकी विदर्भाती एक मोठं नाव होतं.
अकोला: संयुक्त महाराष्ट्र मिळविण्यासाठी सर्वपक्षीय महाराष्ट्रवादी नेते हे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या झेंडयाखाली एकवटले असता काँग्रेसमध्ये शिल्लक राहिलेल्या महाराष्ट्रवादींपैकी विदर्भाती एक मोठं नाव होतं.
खरं तर आज त्यांची जयंती. श्यामरावांसारख्या कष्टाळू शेतकऱ्याच्या पोटी झाला. घरची परिस्थिती तशी यथातथा असली तरी श्यामरावांनी शेती गहाण टाकून त्यांना उच्चशिक्षणासाठी लंडनला पाठवले.
१९२७ च्या सुमारास ते पदवी घेऊन भारतात परतले तेव्हा सुध्दा त्यांच्या डोक्यावर भलं मोठं कर्ज होतं.
त्यांच्या आंतरजातीय विवाहाला खुद्द प्रबोधनकार ठाकरे यांचं मोठं पाठबळ होतं. सुरूवातीपासूनच त्यांना दलित बहुजनांचा कळवळा. नोव्हेंबर १९२७ मध्ये लग्नात व वडिलांच्या श्राद्धदिनी त्यांनी दलितांना सन्मानाने जेवू घातले.
पुढे १९२८ साली, अमरावती जिल्हा परिषदेवर भाऊसाहेब अध्यक्ष म्हणून निवडून आले. तेथे त्यांना संसदीय प्रणालीचे बाळकडू मिळाले.
गांधीजींच्या सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना पाठवले. १९३० साली तत्कालीन मध्य प्रदेश विधिमंडळाचे आमदार झाल्यावर ते शिक्षण व कृषिमंत्री झाले.
१९३३ साली, हरिजन सेवक संघाच्या कार्यासाठी गांधीजींबरोबर वऱ्हाड प्रांताचा दौरा केला. पुढे मराठी साहित्यिक म्हणून नावारूपाला आलेल्या वि. भि. कोलते व कुसुमावती देशपांडे यांच्या प्राध्यापक म्हणून नियुक्तीस देशमुखांनी मंत्री म्हणून मान्यता दिली. कृषिहितार्थ ‘कर्जलवाद कायदा’ त्यांनी मान्य करून घेतला आणि शेतक-यांच्या कर्जनिवारणाची वाट मोकळी करून दिली. त्यानंतर मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
१९३६ साली, विदर्भवासी ब्राम्हणेतर युवकांची परिषद प्रबोधनकार ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली भरवली.
१९३९ व १९४२ साली झालेल्या ‘मराठी परिषदांमध्ये जागतिक’ युद्धात इंग्रजांना पाठिंबा देण्यास नकार दिला. स्वत: स्थापिलेल्या अमरावतीच्या शिवाजी हायस्कूल व श्रद्धानंद अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांना ‘चले जाव’ आंदोलनात भाग घेण्यास देशमुखांनी प्रेरित केले.
१९४५च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी, तत्कालीन शेतकरी संघात ‘भाऊसाहेब’ म्हणून लोकप्रिय असलेल्या देशमुखांनी आपला प्राणप्रिय ‘शेतकरी संघ’ काँग्रेसमध्ये विलीन केला.
जिल्हा परिषद इमारतीसमोर सुभाषचंद्र बोस व क्रांतीसिंह नाना पाटील यांचे पुतळे देशमुखांनी उभारून समकालीनांची थोरवी ओळखणा-या आपल्या उदार मनाची साक्ष अप्रत्यक्षरीत्या जनतेला दिली.
१९४६-५० दरम्यान घटना समितीत काम करताना, देशातील सर्व जाती धर्मियांना समान न्याय देण्यासाठी देशमुखांनी ५०० दुरुस्त्या सुचविल्याबद्दल डॉ. आंबेडकरांनी त्यांची प्रशंसा केली.
१९५२ ते १९६२ दरम्यान देशमुख अमरावतीचे खासदार म्हणून निवडून आले आणि देशाचे अन्नमंत्री म्हणून कार्यरत होते.
खेडे हा घटक आणि मराठी भाषिक सलगता’ या तत्त्वांवर महाराष्ट्र निर्माण व्हावा यास्तव झालेल्या आंदोलनसमयी इतर विदर्भ काँग्रेस नेते वेगळया विदर्भाची मागणी करत असताना, तत्कालीन नागपूर करारावर देशमुखांनी सही करून आपले महाराष्ट्र वादित्व सिद्ध केले.
आपल्या समाजवादी व पुरोगामी विचारांनी त्यांनी कैकवेळा लोकांना प्रभावित केले होते. गाडगेबाबांच्या महान सेवाकार्यापुढे प्रसंगी त्यांना नतमस्तक झालेले लोकांनी पाहिले. तसे अत्रे देखील गाडगेबाबांचे भक्त. त्यांचे कीर्तन मुंबईत असो वा पुण्यात, ते ऐकण्यास अत्रे मात्र हजर. त्यांनी आपल्या ‘म. फुले’ चित्रपटाचा आरंभ गाडगेबाबांच्या कीर्तनाने केला.
१९५३ साली स्त्री शिक्षणास पुरक ठरण्यासाठी देशमुखांनी कन्या वस्तिगृहाची शाखा विदर्भात सुरू केली. भाऊसाहेबांचेआपल्या चारचाकीच्या चालकावर मनापासून प्रेम. चालकाच्या शिदोरीतील भाकरचटणी ओरपण्यास ते मागेपुढे पाहत नसत.
अमरावती विद्यापीठ स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा. मराठी व भारतीय समाजाच्या हितासाठी प्रसंगी देशीविदेशी संचार केला. बहुजन समाजाच्या उद्धारार्थ घेतलेले व्रत अखेपर्यंत जोपासले.
खरं तर भाऊसाहेब डॉ.पंजाबराव देशमुख यांची थोरवी लिहिण्या - सांगण्यासाठी नसून आज असंख्य बहूजन समाज त्यांनी आणलेल्या शिक्षणाच्या गंगोत्रीचं अमृत चाखत आहे. त्या गंगोत्रीच्या काठावर श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या नावाने लावलेलं रोपटं आज भल्या मोठ्या वटवृक्षात बदललंय.