Akola : विनयभंग प्रकरणी आरोपीला सश्रम कारावासाची शिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Molestation Crime News

Akola : विनयभंग प्रकरणी आरोपीला सश्रम कारावासाची शिक्षा

अकोला : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी. गोगरकर यांच्या न्यायालयाने दहा वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. याव्यतिरिक्त आरोपीला इतर कलमाअंतर्गत शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

घटनेची हकीकत अशी की पिडीता ही तिच्या मैत्रिणी सोबत १९ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ६ वाजता जवाहर नगर येथील संभाजी पार्क येथे स्किपींगच्या उड्या मारण्यासाठी तसेच झोका खेळण्यासाठी गेली होती. तेव्हा आरोपी शिवकुमार उर्फ शवा निळकंठ बोंद्रे (वय ३७, मणकर्णा प्लॉट, शिवाजी कॉलेज रोड, गवळीपूरा) हा चार ते पाच दिवसापासून पिडीतेला दररोज खेळताना बघायचा व १९ ऑक्टोबर रोजी पिडीता ही संभाजी पार्क येथे खेळत असताना आरोपी याने तिला सांगितले की तुझी सायकल कोणीतरी मुलगा घेवून गेला आहे व मी त्याला पाहिले आहे व तिला त्यांच्या मोटर सायकलवर बसून चल असे म्हणून मोटार सायकलवर बसवून पिकेव्ही परिसरात घेवून गेला आणि पिडीतेचा विनयभंग केला.

या प्रकरणी पिडीतेच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात पोलिस स्टेशन सिव्हील लाईन येथे कलम ३६३, ३६६ अ, ३५४ अ, ३५४ ब, ३५४ - ड, ३७९ व कलम ७, ८, ९ एम, १०, ११, १२, १८ पोक्सो कायदा व कलम ८४ जे.जे. ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला व सदरहू गुन्ह्याच्या तपास पूर्ण झाल्यावर आरोपी विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले.

या प्रकरणात सरकार पक्षाने गुन्हा सिद्धा होण्यासाठी एकूण १२ साक्षीदार तपासले. तसेच पिडीता व तिच्या मैत्रिणीने कोर्टा समक्ष आरोपीला ओळखले. सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य माणून न्यायालयाने आरोपी शिवकुमार उर्फ शिवा निळकंठ बोंद्रे याला कलम ३६३, ३६६ अ व कलम १८ पोक्सो कायदा व कलम ८४ जे.जे. ॲक्ट अंतर्गत दोषी ठरवून दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व दहा हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावली.

तसेच कलम ३५४ अ, ३५४ ब, ३५४ ड व कलम ७, ८, ११, १२ पोक्सो कायद्याअंतर्गत दोषी ठरवून पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावली. सदर प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील शाम खोटरे व शीतल भुतडा यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.