आमदार अमोल मिटकरींनी अनुभवली एक जीवघेण्या खेळाची निगरगट्ट रात्र!

विवेक मेतकर
Tuesday, 15 September 2020

 राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या मित्राचे वडील कोरोना पाॅझिटिव्ह आले. या कुटुंबाला मदत करताना मिटकरी यांना जे काही अनुभव आले आहेत. ते त्यांनी आपल्या फेसबूक पोस्टच्या माध्यमातून शब्दबद्ध केले आहेत

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या मित्राचे वडील कोरोना पाॅझिटिव्ह आले. या कुटुंबाला मदत करताना मिटकरी यांना जे काही अनुभव आले आहेत. ते त्यांनी आपल्या फेसबूक पोस्टच्या माध्यमातून शब्दबद्ध केले आहेत. एकूण कोरोनाशी लढताना प्रशासन, खासगी डाॅक्टर यांच्याकडून मिळालेले अनुभव लिहिताना आपण एक निगरगट्ट रात्र अनुभवली, असे मिटकरी यांनी म्हटले आहे.

माझ्या मित्रांचे वडील काल कोरोना  पॉझिटिव्ह आले हे समजताच त्यांनी मला संपर्क केला. संपर्क याकरिता केला की त्यांच्या वडिलांना आयसीयुमध्ये  अॅडमिट करायला बेड आणि व्हेंटिलेटर ची आवश्यकता होती. ज्यांनी फोन केला ते  आर्थिक दृष्ट्या अत्यंत सक्षम होते. अकोल्यामध्ये दोन मोठी हॉस्पिटल आहेत. मात्र तिथे त्यांची व्यवस्था होऊ शकली नाही.  पैसा उपलब्ध असतानासुद्धा अकोला जिल्ह्यात बेड उपलब्ध न होणे सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

.....सर्वानुमते  निर्णय घेऊन एका खाजगी  डॉक्टरच्या सल्ल्या वरून आम्ही पेशंटला नागपुर मध्ये  'वोकार्ड" हॉस्पिटल ला (बेड व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याचे  सांगितल्यावर)  त्यांच्यावर विश्वास ठेवून  एका सुसज्ज ॲम्बुलन्स मध्ये रात्री एक वाजता मेडिकल ऑफिसर घेऊन नागपूरला पाठविले. रात्री साडे तीन वा. पेशंट घेऊन ॲम्बुलन्स त्या  हॉस्पिटल समोर पोहोचली.  मला रात्री साडेतीन वाजता मित्रांनी   कॉल केला व ॲम्बुलन्स बाहेर उभी आहे. मात्र आत बेड उपलब्ध नाहीत, असे डॉक्टर सांगताहेत असे सांगितले.  पेशंट फक्त ऑक्सिजनवर आहे आणि खाजगी डॉक्टर च्या सांगण्यावरून आपण तिथपर्यंत पेशंट पाठवल्यानंतर सुद्धा समोरच्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करत नसतील  तर ही बाब फार गंभीर आहे.

 

"मी अनुभवलेली कालची एक निगरगट्ट रात्र " माझ्या मित्रांचे वडील काल कोरोना पॉझिटिव्ह आले हे समजताच त्यांनी मला संपर्क...

Posted by Amol Mitkari on Sunday, 13 September 2020

....... तितक्याच रात्री एका खाजगी कोविड सेंटर वर काही डॉक्टर  मित्र व मी  अनेक डॉक्टरांच्या  संपर्कात राहिलो. मात्र रात्री साडेतीन वाजता कुठल्याच डॉक्टरांनी प्रतिसाद दिला नाही.  नागपूरमधील श्रीमंत डाॅक्टरांनीही कुठलाही प्रतिसाद दिला नाही.

नंतर वर्धा, सावंगी मेघे, याठिकाणी फोन केले. पेशंटला परत इथे आणावे का तर अकोल्यातील सर्व दवाखान्यात फोन केले. सरकारी दवाखाने हाउसफुल, प्रायव्हेट दवाखाने हाउसफुल,  नागपुर मधील दवाखाने हाउसफुल, पेशंट कडे स्वतःच्या गाड्या आहेत, अनेक मोठ्या लोकांशी संपर्क आहेत,  असे असताना सुद्धा पेशंटला एक व्हेंटिलेटर व बेड उपलब्ध नसणे हे फार धक्कादायक आहे.  अखंड प्रयत्नानंतर शेवटी सरकारी दवाखान्यातच सद्यस्थितीत पेशंटला भरती करावे लागले आहे. 

विचार करण्यासारखी बाब ही की मी आमदार असतांना व पेशंट सुद्धा आर्थिक सक्षम असतांना जर प्रायव्हेट डॉक्टर्स असा जीवघेणा खेळ खेळून, रात्री फोन बंद करून प्रतिसाद देत नसतील तर सामान्य माणसाचं जगणं म्हणजे हा एक फक्त खेळ आहे असे समजायचे का??.....असा प्रश्न मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.

श्रीमंत लोकांची अशी अवस्था तर गोरगरिबांच्या अवस्था किती बिकट असेल ना?? आता ह्या साखळ्या शोधून काढाव्या लागतील. मग आमच्या जीवाशी खेळायची वेळ आली तरी बेहत्तर. मात्र हा माज, ही मस्ती अशीच सुरु राहिली तर येणाऱ्या काही दिवसात प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाच्या व्यक्ती जग सोडुन गेलेल्या असतील, असे म्हणत मिटकरी यांनी आपल्या फेसबूक पोस्टचा शेवट केला आहे आणि रुग्णांना उपयोगी पडावेत, म्हणून काही संपर्क क्रमांकही दिले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola ncp mla-amol mitkari explains experience hospitals and doctors