बावीस वर्षांचा युवक ‘पोल्ट्री’तून मिळवितो महिन्याकाठी दोन लाख

प्रा.अविनाश बेलाडकर  | Wednesday, 21 October 2020

आर्थिक मंदी आणि बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढलेल्या काळात नोकरीवर अवलंबून न रहाता स्वयंरोजगारातून घवघवीत उत्पन्न मिळविता येऊ शकते, असा आदर्श वस्तुपाठ मूर्तिजापूर तालुक्यातील एका युवकाने नोकरीच्या शोधातील युवकांना घालून दिला. या तालुक्यातील सिरसो येथील प्रतिक मेहरे असे या युवकाचे नाव आहे.

मूर्तिजापूर (जि.अकोला) : आर्थिक मंदी आणि बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढलेल्या काळात नोकरीवर अवलंबून न रहाता स्वयंरोजगारातून घवघवीत उत्पन्न मिळविता येऊ शकते, असा आदर्श वस्तुपाठ मूर्तिजापूर तालुक्यातील एका युवकाने नोकरीच्या शोधातील युवकांना घालून दिला.
या तालुक्यातील सिरसो येथील प्रतिक मेहरे असे या युवकाचे नाव आहे.

त्याने कुक्कूट पालनाचा (पोल्ट्री) व्यवसाय उभारला. कमालीची प्रगती साधली. सध्या तो महिन्याकाठी दोन लाख रुपये कमावतो. वडिलोपार्जितीत शेतीमधील वाट्याला आलेली चार एकर शेती त्याचे वडील पिकवित होते; पण म्हणावे तसे उत्पन्न होत नव्हते. पाच वर्षापूर्वी प्रतिकच्या वडिलांचे अचानक निधन झाले.

शिक्षण, मोठ्या बहिणीचे लग्न, ही विवंचना प्रतिक आणि त्याच्या आईसमोर होती. न डगमगता पैशांची जुळवाजुळव करून गेल्या वर्षी प्रतीकने बहिणीचे लग्नही उरकवून टाकले. डोक्यावरील कर्जाचा डोंगर विचार प्रवर्तक ठरला. शेतीला पुरक व्यवसाय त्याने निश्चित केला. वाटचाल सुरू झाली. त्याच्या भावाने डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून कुक्कूट पालन आभ्यासक्रम व प्रशिक्षण पूर्ण केलेले होतेच. तो पूरक ठरला.

लगेच शेती गहाण ठेऊन कॕनरा बँकेचे १८ लाख रुपये कर्ज उचलले. कुक्कूट पालन व्यवसाय उभारला. त्यासाठी १० गुंठ्यांवर ३५० फुट आकाराचे २० लाख रूपये खर्चून मोठे शेड उभे केले. महिन्याकाठी दहा हजार पक्षांचे संगोपन करण्या इतपत व्यवस्था सध्या त्याच्याकडे आहे. दर महिन्याला तो दहा हजार पक्षी (कोंबड्या) विकतो. सर्व खर्च वजा जाता महिन्याकाठी तो दोन लाख रुपये शुद्ध नफा कमावतो.

शेतीला पुरक कुक्कूट पालन व्यवसाय उभारून केलेल्या आणि यशस्वी ठरलेल्या धाडसाबद्दल प्रतिकचे सर्वत्र कौतुक, तर होतच आहे तो इतरांना मार्गदर्शकही ठरत आहे.

एका इंजिनियर मित्राचा आनुभव उपयोगी पडला. दादाचे प्रशिक्षण झालेले होते, ते पूरक ठरले. शेती रस्त्यालगत होती. वीज, पाणी उपलब्ध होते, म्हणून कुक्कूट पालनाचा व्यवसाय निवडला. आपल्या आवडीचा आणि सुविधाजनक व्यवसाय निवडला की यशस्वी होणं कठीण नाही.
-प्रतिक मेहेरे, सिरसो, ता.मूर्तिजापूर.

(संपादन - विवेक मेतकर)