काटेपूर्णा बॅरेजला ५३३ कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता

akola news 533 crore revised administrative approval for Katepurna Barrage
akola news 533 crore revised administrative approval for Katepurna Barrage

अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील मंगरुळ कांबे परिसरातील काटेपूर्णा बॅरेज मध्यम प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता बुधवार, ता.२४ मार्च रोजी राज्य शासनाने दिली आहे. मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. सुमारे ५३३ कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव शासनाने मान्य केला. अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी खास प्रयत्न केलेत.
विदर्भातील खारपाणपट्ट्यातील अकोला जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी राज्य शासनाने २००७ मध्ये हा प्रकल्प प्रस्तावित केला होता. विदर्भातील त्यातही विशेषतः पश्चिम विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी राज्यपालांनी निर्देश दिले आहेत. केंद्र शासन पुरस्कृत बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही योजना प्रस्तावित आहे.

काटेपूर्णा बॅरेजच्या प्रकल्पाचा प्रस्ताव ३१ ऑगस्ट २००७ रोजी सादर करण्यात आला होता. प्रकल्प प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवताना ७० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. परंतु, राज्य सरकारकडून निधी मिळाला नाही. बांधकाम साहित्याच्या दरात झालेली वाढ, भूसंपादनाकरिता झालेला विलंब यासारख्या कारणांमुळे प्रकल्पावर आता ५३३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित करण्यात येत आहे. चौदा वर्षांपूर्वी ७० कोटींमध्ये मंजूर झालेल्या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी आता अतिरिक्त ४६३ कोटींचा खर्च होणार आहे. आतापर्यंत या प्रकल्पावर १९६ कोटी खर्च करण्यात आले आहेत.
..................... 
आराखडा मंजुरीला विलंबाने प्रकल्प रेंगाळला
काटेपूर्णा प्रकल्प रेंगाळण्यामागे नाशिक येथील सेंट्रल डिझाइन ऑर्गनायझेशन जबाबदार असल्याचा आरोप नेहमीच होत आला आहे. सीडीओकडून प्रकल्पाचा आराखडा मंजूर होण्यास विलंब झाला. त्याकाळात प्रकल्पावरील प्रस्तावित खर्च वाढला, असा दावा करण्यात आला आहे. काटेपूर्णा बॅरेजचे पाणी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीतून होणार आहे. मूर्तिजापूर शहराचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न या प्रकल्पाने सुटेल. त्याकरिता ६.४५ कि.मी.आणि ७.३८ कि.मी. लांबीचे दोन कालवे बांधण्यात येणार आहेत.
.............................................................. 
 प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण
राज्य सरकारकडून पुरेसा निधी मिळाल्यास हा प्रकल्प २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येणार होता. या प्रकल्पात ७.८० द.ल.घ.मी पाणीसाठा होणार आहे. ३२२ हेक्टरवर हा प्रकल्प उभा राहत आहे. त्यापैकी ३०८ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणखी १४ हेक्टर जमीन येत्या काळात संपादित होईल. आतापर्यंत बॅरेजचे ८० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आला आहे.
........................
सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार
अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर तालुक्यातील मंगरुळ कांबे गावाजवळ बांधण्यात येणाऱ्या काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. काटेपूर्णा प्रकल्पास ५३३ कोटी ८१ लाख इतक्या खर्चाच्या सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत. काटेपूर्णा प्रकल्पामुळे १३ गावांमधील चार हजार १३७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याची माहिती पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिली. या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी म्हणून जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री या नात्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जलसंपदा मंत्री जयंती पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com