अंधारलेल्या स्मशानभूमीत ‘अभ्युदय’ने लावले माणुसकीचे दिवे

सकाळ वृत्तसेवा | Sunday, 15 November 2020

ज्या घरी अंधार आहे, त्या घरी उजळो दिवे! या ओळीप्रमाणे पातुरच्या अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने अंधारलेल्या स्मशानात माणुसकीचे दिवे लावून अभिनव दिवाळी साजरी केली. यावेळी स्मशानभूमीत सेवा देणाऱ्या कुटुंबाची दिवाळी गोड करण्याचा अभिनव उपक्रम अभ्युदय फाउंडेशनने केला.

पातूर (जि.अकोला)  ः ज्या घरी अंधार आहे, त्या घरी उजळो दिवे! या ओळीप्रमाणे पातुरच्या अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने अंधारलेल्या स्मशानात माणुसकीचे दिवे लावून अभिनव दिवाळी साजरी केली.

यावेळी स्मशानभूमीत सेवा देणाऱ्या कुटुंबाची दिवाळी गोड करण्याचा अभिनव उपक्रम अभ्युदय फाउंडेशनने केला.

पातूर येथील अभ्युदय फाउंडेशन ही सेवाभावी संस्था विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असते. ही संस्था गत तीन वर्षांपासून पातुरच्या स्मशानभूमीत देखभाल, दुरुस्ती व सेवा देण्याचे कार्य करीत आहे.

स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना चोवीस तास सेवा देण्यासाठी कर्मचारी नियुक्त केला आहे. या स्म्शानात राहणाऱ्या कुटुंबाची दिवाळी गोड करण्यासाठी या अभ्युदय फाउंडेशनने पुढाकार घेतला.

दिवाळीच्या पर्वावर या कुटुंबातील सर्व सदस्यांना कपडे, दिवाळीचा फराळ, सुगंधी उटणे, पणत्या, किराणा, मिठाई भेट दिली. अभ्युदय फाउंडेशनने अंधारलेल्या घरात उजेड देऊन अभिनव दिवाळी साजरी केली.

सायंकाळी हा परिसर दिव्यांच्या लखलखाटाने जगमगला होता, तर स्मशानातील कुटुंबाच्या घरात आनंदाचा उत्सव साजरा होत होता.

या अभिनव दिवाळीत साहित्याचे वाटप अभ्युदय फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाल गाडगे, सचिव बंटी गहिलोत, डॉ. संजयसिंह परिहार, प्रवीण निलखन, प्रशांत बंड, दिलीप निमकंडे, यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी योगेश गाडगे, शुभम पोहरे उपस्थित होते.लावले माणुसकीचे दिवे

(संपादन - विवेक मेतकर)