मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे, हेल्मेट न घालता दुचाकी चालविणारे, चार चाकी चालविताना सीटबेल्ट न लावणारे, दुचाकी, चारचाकी चालविताना मोबाईल वर बोलणारे, दारू पिऊन वाहन चालविणारे, धोकादायक रित्या वाहन चालविणाऱ्या, चुकीच्या मार्गाने वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर धडक कारवाई करण्यात आली. दीड महिन्यात एकूण २६८५ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
अकोला ः शहरात व जिल्ह्यात रस्ते अपघातात मोठी वाढ दिसून येत आहे. या अपघाताचे प्रमुख कारण वाहतुकीच्या नियमांचा भंग करून बेदरकार पणे वाहन चालविणे. इतर भौगोलिक कारणाने रस्ते अपघात होऊन हकनाक लोक मृत्यूमुखी पडतात. जिल्ह्यात वाढत असलेले रस्ते अपघात कमी व्हावे म्हणून पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांचे निर्देशा प्रमाणे मागील दीड महिन्यापासून जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके व उपनिरीक्षक सुरेश वाघ यांनी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून २६८५ वाहनांवर धडक कारवाई केली आहे.
मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे, हेल्मेट न घालता दुचाकी चालविणारे, चार चाकी चालविताना सीटबेल्ट न लावणारे, दुचाकी, चारचाकी चालविताना मोबाईल वर बोलणारे, दारू पिऊन वाहन चालविणारे, धोकादायक रित्या वाहन चालविणाऱ्या, चुकीच्या मार्गाने वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर धडक कारवाई करण्यात आली. दीड महिन्यात एकूण २६८५ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
त्यांच्या जवळून १५ लाखांवर दंड वसूल करण्यात आला. धडक मोहीम पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांचे निर्देशाप्रमाणे व अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत व उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन शेळके व उपनिरीक्षक सुरेश वाघ व वाहतूक पोलिस अंमलदार यांनी केली आहे.
अशी केली कारवाई
मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणारे एकूण ४७०, धोकादायक रित्या वाहन चालविणाऱ्या ३०, मद्य प्राशन करून वाहन चालविणारे चार, चुकीच्या मार्गावरून वाहन दामटनारे ६६, हेल्मेट न घालता दुचाकी चालविणारे ५८०, सीट बेल्ट न लावता चारचाकी चालविणारे ११९०, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्या २८० वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
रस्त्यावरील प्राणांतिक अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी मोटारवाहन कायद्याचे पालन करून अपघात टाळण्यासाठी प्रशासनाला मदत करावी.
- गजानन शेळके, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा
(संपादन - विवेक मेतकर)