Video : शेतकरी संघटनेचे केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या निवासस्थानासमोर राखरांगोळी आंदोलन

विवेक मेतकर
Wednesday, 23 September 2020

केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खेळ चालवला आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनाची राखरांगोळी न करता निर्यातबंदी त्वरित मागे घ्या, या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले.

अकोाला: केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खेळ चालवला आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनाची राखरांगोळी न करता निर्यातबंदी त्वरित मागे घ्या, या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले.

मागणीचे निवेदन तसेच राखेची पुडी धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांच्या स्वाधिन करण्यात आली. संघटनेचे प्रदेश प्रवक्ता ललित बहाळे यांनी आंदोलकांचे म्हणणे वरिष्ठापर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सुटका केली.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

 विदेश व्यापार मंत्री पियुष गोयल यांची जबाबदारी व्यापार वाढवण्याची आहे, कमी करण्याची नाही, असे सांगून कांद्यावरील निर्यातबंदी करुन गोयल आपल्या जबाबदारीपासून पळ काढत आहेत. निर्यातबंदी केल्यास शेतक-यांचे जीवन संकटात येईल, त्यामुळे हा घातकी निर्णय त्वरित मागे घ्यावा, असे ललित बहाळे म्हणाले.

शेतमालाला जीवनावश्यक वस्तू कायद्याबाहेर काढल्याने निर्यात बंदी करता येत नाही, त्यामुळे सरकारचा निर्णय आत्मघातकी असल्याची टीका बहाळे यांनी केली. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या अनुपस्थितीत त्यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना निवेदन आणि राखेची पुडी सोपवली. आमचे म्हणणे मंत्र्यांपर्यंत पोहचवा, असे ते म्हणाले. कांद्यावरील निर्यातबंदी मागे घ्या, शेतकरी संघटनेचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.

धोत्रे यांच्या निवासस्थानासमोर पोलिस बंदोबस्त चोख होता. आंदोलकांना वाटेतच अडवून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. या प्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश जोगळे, विदर्भ युवा आघाडी अध्यक्ष डॉ. निलेश पाटील, धनंजय मिश्रा, सोशल मीडिया प्रमुख विलास ताथोड, तंत्रज्ञान प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर, शंकर कवर, राजाभाऊ देशमुख, अरविंद तायडे, दिनेश देऊळकार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येत सहभागी होते. आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका झाली. सिव्हिल लाईन पो. स्टे.चे निरीक्षक बी. के. मडावी, वाहतूक शाखा प्रमुख गजानन शेळके यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला होता. शिघ्र गतीदलही तैनात होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: An agitation in front of the residence of Union Minister of State Sanjay Dhotre