अमरावती शिक्षक मतदारसंघ; ८४.३४ टक्के मतदान कुणाच्या बाजूने?

Akola News: Amravati Teachers Constituency; 84.34 per cent turnout in favor of whom?
Akola News: Amravati Teachers Constituency; 84.34 per cent turnout in favor of whom?

अकोला : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत मंगळवारी (ता. १ डिसेंबर) जिल्ह्यातील १२ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली.

यावेळी शिक्षक मतदारांनी उत्स्फूर्त मतदान केल्यामुळे जिल्ह्यात ८४.३४ टक्के मतदान झाले. यावेळी ३ हजार ७४४ पुरूष शिक्षक व १ हजार ७२१ महिला शिक्षकांनी अशा एकूण ५ हजार ४६५ मतदारांनी मतदान केले.

जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर सकाळी ८ वाजतापासून सायंकाळी ६.१५ पर्यंत मतदान करण्यात आले. दरम्यान मतदानानंतर २७ उमेदवारांचे राजकीय भविष्य मतपेट्यांमध्ये बंद झाल्याने आता मतमोजणीची उत्सुकता लागली आहे.


निवडणूक आयोगाने अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे सादर करण्यासाठी ५ ते १२ नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी दिला होता. सदर कालावधीत एकूण २८ नामनिर्देशन पत्रे सादर करण्यात आली. १३ नोव्हेंबररोजी छाननी प्रक्रिया पार पडली व सर्व नामनिर्देशन पत्रे वैध ठरली.

१७ नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी एका उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतल्याने आता २७ उमेदवार निवडणूक रिंगणार आहेत. सदर उमेदवारांचे राजकीय भविष्य ठरवण्यासाठी मंगळवारी (ता. १) जिल्ह्यातील १२ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. यावेळी शिक्षक मतदारांनी उत्साहात मतदान केल्यामुळे जिल्ह्यात ८४.३४ टक्के मतदान झाले.

श्रीकांत देशपांडे विरोधात निवडणूक विभागाकडे तक्रार
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये शहरातील आगरकर विद्यालयाच्या मतदान केंद्रावर सर्वच उमेदवारांनी आपले मतदान बुथ ठेवले, परंतु महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांच्या समर्थकांनी मतदान केंद्राबाहेरील बुथवर चक्क शिक्षक आघाडीचे पोस्टर लावले होते. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार महेश डवरे यांनी आक्षेप घेत निवडणूक विभागाकडे देशपांडे विरुद्ध आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल केली आहे.


सुरक्षित नियमांचा फज्जा
मतदान प्रक्रियेदरम्यान स्थानिक राधादेवी गोयनका महाविद्यालयातील केंद्रावर मतदानाच्या वेळी कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या सुरक्षित नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. शिक्षक व शिक्षिका मतदारांच्या रांगा लागल्याने एका मागे एक शिक्षक उभे होते.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com