esakal | बंजारा काशीला हुंदका झाला अनावर, बंजारा समाजाचे धर्मगुरू पद्मश्री डॉ. संत रामराव महाराज अनंतात विलिन
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Banjara communitys religious leader Padma Shri Dr. Saint Ramrao Maharaj merged into infinity

देशभरातील बंजारा समाजाचे धर्मगुरू पद्मश्री डॉ. संत रामराव महाराज यांच्यावर रविवारी (ता.१) दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देशभरातून आलेल्या लाखो भाविकांचा हुंदका अनावर झाला होता.

बंजारा काशीला हुंदका झाला अनावर, बंजारा समाजाचे धर्मगुरू पद्मश्री डॉ. संत रामराव महाराज अनंतात विलिन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

मानोरा (जि.वाशीम) :  देशभरातील बंजारा समाजाचे धर्मगुरू पद्मश्री डॉ. संत रामराव महाराज यांच्यावर रविवारी (ता.१) दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देशभरातून आलेल्या लाखो भाविकांचा हुंदका अनावर झाला होता.

रामराव महाराज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले तर, कुटुंबियांनी संयुक्तपणे भडाग्नी दिला. प्रशासनच्या वतीने पोलिसांनी सलामी देऊन २१ बंदुकीच्या फैरी झाडल्या. संत रामराव महाराज यांचा मृततदेह राष्ट्रध्वजाने झाकण्यात आला. अंत्यविधीला देशातील हजारोंच्या संख्येने बंजारा भाविक उपस्थित होते.


संत रामराव महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी पोहरादेवी येथे एकच गर्दी पहावयास मिळाली. ‘संत रामराव महाराज की जय’, अशा घोषणा देण्यात येत होत्या तर, भाविकांकडून फुलांचा वर्षाव सुद्धा करण्यात येत होता.

यावेळी वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, चंद्रशेखर बावनकुळे, मदन येरावार, खासदार भावना गवळी, मा.खासदार हरिभाऊ राठोड, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार निलय नाईक, आमदार इंद्रजित नाईक, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, आमदार तुषार राठोड, आमदार रमेश महाराज कर्नाटक, माजी खासदार गोविद महाराज, माजी मंत्री संजय देशमुख, माजी आमदार अनंतकुमार पाटील, मा.वीज मंडळ सदस्य अनिल राठोड, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक विजय कुमार चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पाटील, तहसीलदार संदेश किर्दक, सा.बा. विभागाचे अधीक्षक गिरीश जोशी, अनंत गनोकर, शाखा अभियंता शेषराव बिलारी यांची उपस्थिती होती.

भाविकांनी केले खिचडी, चहा, पाणी वाटप
ठिकठिकाणी खिचडी, पाणी वाटप करण्यात आले. संत रामराव महाराज यांच्या बाहेरच्या भाविक भक्तांना कोणताही त्रास होऊ नये व येणारा भाविक हा उपाशी पोटी जाऊ नये याकरिता अनेक भाविकांनी स्वयंस्फुर्तीने मोठ्या प्रमाणात खिचडी व चहा वाटप केले.

पोलिस पाटील संघटनेचे मोलाचे योगदान
मानोरा तालुक्यातील पोलिस पाटील संघटना यांनी पोलिस बंदोबस्त करण्यासाठी मोलाचे योगदान दिले तर, कोणालाही त्रास होणार नाही त्याकरिता पोलिस पाटील यांनी सहकार्य केले.

संत रामराव महाराज गेल्याने समाज व भाविक पोरके झाले ः  शंभुराजे देसाई
बंजारा समाजाचे धर्म गुरू संत डॉ. रामराव महाराज यांचे कार्य उल्लेखनिय आहे. त्यांनी समाजाला योग्य दिशा दिली तर, इतर समाजाला सुध्या दिशा देण्याचे कार्य केले. त्याच्या कार्याची पावती लोकाभिमुख आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती शिकला पाहिजे, सुखी झाला पाहिजे, अशी त्यांची भावना होती. त्यांच्या जाण्याने बंजारा समाजच नव्हे तर, सर्व भाविक पोरके झाल्याचे मत पालकमंत्री शंभुराजे देसाई यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठविलेला शोक संदेश त्यांनी यावेळी वाचून दाखविला.

बंजारा काशी झाली पोरकी
संपूर्ण देशांतून दरवर्षी गुरूपोर्णिमेला हजारो भाविक संत रामराव महाराज यांच्या दर्शनासाठी येत असतात तसेच रामनवमीला सुध्दा मोठा जनसमुदाय जमतो. जगदंबा शक्तीपीठासमोर संत रामराव महाराज यांची खोली पाहून बंजारा भगिनींना शोक अनावर झाला होता. पोहरादेवीत येणारा प्रत्येक भाविक रामराव महाराज यांचे दर्शन घेऊनच जात होता. मात्र आज पोहरादेवीत गर्दी दिसत असली तरी गावात निरव शांतता पसरली होती.

पंतप्रधान मोदीं यांचेसह अनेकांनी पाठविले शोक संदेश
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मोहन भागवत, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, यांचेसह अनेकांनी शोक संदेश पाठवून संत रामराव महाराज यांच्या अंत्यविधीला उपस्थिती दाखविण्याचा प्रयत्न केला.

हजारो भाविक आले आणि दर्शन घेऊन गेले
३१ ऑक्टोबरच्या रात्री हजारो भाविक भक्त आले आणि महाराजांचे दर्शन घेऊन परत गेले. नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सुद्धा दर्शन घेतले.

(संपादन - विवेक मेतकर)