
केंद्राच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या आंदाेलनांला पाठिंबा जाहीर करीत भारत बंदची हाक देण्यात आली आहे. आज मंगळवार, ता. ८ डिसेंबर राेजी आयोजित या भारत बंदमध्ये अकोला जिल्ह्यातील राजकीय पक्ष व विविध संघटनाही सहभागी होत आहे.
अकोला : केंद्राच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या आंदाेलनांला पाठिंबा जाहीर करीत भारत बंदची हाक देण्यात आली आहे. आज मंगळवार, ता. ८ डिसेंबर राेजी आयोजित या भारत बंदमध्ये अकोला जिल्ह्यातील राजकीय पक्ष व विविध संघटनाही सहभागी होत आहे.
शेतकरी संघटनेने या बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. काही प्रमुख व्यापारी संघटनाही बंदपासून अलिप्त राहणार आहेत. काँग्रेसने व्यापारी संघटनांना आवाहन करून बंद सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
भारत बंदला भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आयटक कामगार संघटनेसह अनेक पक्षाने सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. या बंदमध्ये शेतकरी, शेतमजुर, कामगार, व्यापारी, सर्व सामान्य जनतेने सहभागी व्हावे, असे अावाहन करण्यात अाले आहे. बंदमध्येही भाकप धरणे आंदोलन, निषेध मोर्चे काढून सहभागी हाेणार अाहे, असे कॉ. रमेश गायकवाड, कॉ. देवराव पाटील कॉ. कॉ. नयन गायकवाड यांनी कळवले आहे. विविध संघटना व राजकीय पक्षांचा या बंदमध्ये सहभाग असल्याने ग्रामीण भागातही बंदचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचा सक्रीय सहभाग
शिवसेनेने शेतकरी बंदला पाठिंबा घाेषित केला असून, बंदमध्ये सक्रिय सहभाग होणारी असल्याची माहिती निवासी उपजिल्हा प्रमुख गाेपाल दातरक यांनी दिली.
काँग्रेसचे व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन
काँग्रेसने बंदला पाठिंबा दिला आहे. याशिवाय काँग्रेसने मनपातील विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण यांनी व्यापारी संघटनांना या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मंगळवारी बाजारपेठेत फिरूनही बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करणार असल्याचे साजिद खान यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचा बंदला पाठिंबा
राष्ट्रवादी काँग्रेसनेही शेतकऱ्यांच्या मुद्यावरून पुकारण्यात आलेल्या बंदला पाठिंबा जाहीर केला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी दिली आहे.
‘वंचित’चा बंदमध्ये सहभाग
वंचित बहुजन आघाडीने मंगळवारच्या शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा देत सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करीत या बंद सर्वांनी यशस्वी करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यामुळे उद्याच्या बंदमध्ये वंचित बहुजन आघाडीचा सक्रिय सहभाग राहणार आहे.
काही व्यापारी संघटना अलिप्त
भारत बंदमध्ये काही व्यापारी संघटनांनी अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे. विदर्भ चेंबर्स ऑफ काॅमर्स ॲड इंडस्ट्रिजने सध्या तरी बंदमध्ये सहभागी नसल्याचे सांगितले. न्यू क्लाॅथ मार्केट असाेसिएशनने बंदमध्ये सहभागी नसल्याचे सचिव किशाेर मांगटे पाटील यांनी सांगितले आहे. सराफा व्यावसायिक बंदबाबत स्वेच्छेने निर्णय घेणार आहेत. खाद्य पेय विक्रेता असाेसिएशने (हाॅटेल्स) अध्यक्ष याेगेश अग्रवाल यांनी बंदला समर्थन सल्याचे सांगितले. मात्र बंदबाबत सदस्य स्वच्छेने निर्णय घेण्याचे आवाहनही त्यांना हॉटेल व्यावसायिकांना केले आहे.
(संपादन - विवेक मेतकर)