ब्रेक द चेन; सोमवारी सकाळपर्यंत कडक लॉकडाउन!

 akola news Break the chain; Strict lockdown till Monday morning!
akola news Break the chain; Strict lockdown till Monday morning!

अकोला  ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार शुक्रवारी (ता. ९) रात्रीपासून मुक्त संचारावर बंदी लावण्यात आली आहे. सदर बंदी सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहिल. त्यामुळे जिल्ह्यात शनिवारी व रविवारी पूर्ण दिवस कडक लॉकडाउन राहिल, परंतु औषधोपचारांची (मेडिकल) दुकाने व इतर अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहतील.  
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, शासनाने संपूर्ण राज्‍यामध्‍ये कोविड प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा लागू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्‍हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संपूर्ण जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यानुसार ३० एप्रिल पर्यंत रात्रीची संचारबंदी तर दिवसा जमावबंदी जारी करण्यात आली आहे. त्यासोबतच प्रत्येक शुक्रवारी रात्री ८ नंतर ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत मुक्त संचारास मनाई करण्यात आली आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या ‘ब्रेक द चेन’अंतर्गत हे निर्बंध लागू केले आहेत.

या सेवा राहणार सुरू
निर्बंधातून-हॉस्पिटल, रोगनिदान सेंटर्स, क्लिनीक्स, मेडिकल इन्श्युरन्स कार्यालये, औषध विक्रेते व कंपन्या, इतर वैद्यकीय आरोग्य सेवेशी संबंधित घटक व पशुवैद्यकीय सेवा. किराणा दुकाने, भाज्यांचे दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने, फळ दुकाने, रेल्वे, टॅक्सी, ऑटो व सार्वजनिक बस सेवा. मान्सून पूर्व कामे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था. माल वाहतूक. कृषी संबंधित सेवा. ई कॉमर्स. मान्यताप्राप्त मीडिया, सर्व पेट्रोल पंप, गॅस वितरण प्रणाली, वाहनांसाठी वापरण्‍यात येणाऱ्या गॅस वितरण सुविधा. शिवभोजन, स्‍वस्‍त धान्‍य दुकान व त्‍याबाबतची वाहतूक. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घोषित करण्यात येणाऱ्या अत्यावश्यक सेवा यांना सुट राहणार आहे.
-------------
ओळखपत्र आवश्यक
दोन दिवसांच्या कडक लॉकडाउनमधून मेडीकल व इतर अनुषंगिक अत्यावश्यक सेवा, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय आस्थापना, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देणारे घटक, कंपनीत जाणारे व येणारे कामगारांना सुट राहणार आहे. मात्र संचारबंदीच्या काळात संबंधितांनी ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहिल.

दुकाने सुरू; पाेलिस व मनपाच्या पथकांची तारांबळ
काेराेना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव राेखण्यासाठी जिल्ह्यात अशंत: टाळेबंदी सुरू आहे. ही टाळेबंदी झुगारत अनेक व्यापाऱ्यांनी शुक्रवारी सकाळपासूनच त्यांची दुकाने उघडली. त्यामुळे पोलिस व महानगरपालिका पथकाची चांगलीच तारांबळ उडाली. काही ठिकाणी व्यवसाय बंद करण्यास सांगण्यावरून वादही झाले. त्यानंतर पथकांनी पाठ फिरवताच पुन्हा व्यावसायिकांनी व्यवहार सुरू केल्याचे चित्र अकोला शहरात बघावयास मिळाले.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ता. ५ एप्रिल राेजी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्बंध जारी केलेत. हे निर्बंध या महिन्या अखेरीसपर्यंत लागू राहणार आहेत. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान होणार आहे. एकीकडे कोरोनाची भिती तर दुसरीकडे व्यवसाय बुडाल्याने कधीही न भरून निघणारे आर्थिक नुकसान अशा द्विधा मनःस्थितीत असलेल्या व्यापाऱ्यांचा संयम सुटू लागला आहे. त्यामुळे टिळक राेडवर दाेन्ही बाजूची बिगर अत्यावश्यक कापड, चप्पल -बुट, टेलरींग मटेरिअल्स, इलेक्ट्राॅिनक्स वस्तूंसह अन्य अनेक दुकाने सुरू करण्यात आली. बीएसएनएल कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावरील तयार कापडाची पाच दुकाने सुरू हाेती. या दुकानांचे अर्धे शटर सुरू हाेते. नेकलेस राेडवरील तयार कापड, माेबाईल फाेन पार्टस व दुरुस्तीची काही दुकाने सुरू हाेती. गाैरक्षण राेडवर मलकापूरपर्यंत माेबाईल फाेन दुरुस्तीसह अन्य बिगरअत्यावश्यक दुकाने सुरू हाेती.
........................
कामगार प्रतीक्षेत
शहरात अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू केले आहेत. त्यामुळे मुख्य बाजारपेठेतील व्यवसायही सुरू होऊन कामावर जाण्याची संधी मिळेल, या प्रतीक्षेत शुक्रवारीही सकाळपासूनच बाजापेठेत मजूर, कामगार दुकानांपुढे ठिय्या देवून बसले होते. काही व्यापाऱ्यांनी व्यवसाय बंद, वेतन बंद, अशी भूमिका घेतल्याने कर्मचारी धास्तावल्याचे जाणवले. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आल्यानंतरही अनेक ठिकाणची बिगर अत्यावश्यक दुकानांचे शटर डाऊन असले तरी कुलूप मात्र लावण्यात आले नव्हते.
(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com