सण उत्सव काळात काशीफळ खातंय हमखास भाव

गोपाल हागे
Thursday, 27 August 2020

अकोला जिल्हयातील अतुल आखरे यांनी यंदा कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करीत पहिल्यांदाच काशीफळाची लागवड केली. दीड एकरात लागवड करीत सुमारे 60 हजार रुपये कमावले.

अकोला : गणरायाचे आगमन झाले की सण-उत्सवांचे दिवस खऱ्या अथार्ने सुरु होतात. गणपतींपाठोपाठ घरोघरी गौरीही येतात. यामुळे सर्वत्र उत्सवी वातावरण बनते. घरोघरी भंडारे सुरु होतात.

हा कालावधी तसा पावसाचा राहतो. सलग पावसामुळे बाजारपेठेत पालेभाज्यांची संख्या व दर्जाही रोडावलेला राहतो. अशा वेळी काशीफळ हे एक पर्यायी भाजी म्हणून बाजारात सर्वत्र उपलब्ध झालेले असते. एकीकडे नागरिकांना एक वेगळी भाजी उपलब्ध होते तर दुसरीकडे यापासून शेतकऱ्यांना चांगले पैसेसुद्धा मिळत असतात. हे हंगामी स्वरुपाचे पीक ऐन जुलै-आॅगस्टमध्ये काढणीला सुरुवात होते. या काळात मुगाचे पिकही आलेले नसते. अशावेळी शेतकऱ्याला पैसे मिळू लागतात. ही संधी अनेक शेतकरी आता साधत आहेत.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

अकोला जिल्हयातील अतुल आखरे यांनी यंदा कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करीत पहिल्यांदाच काशीफळाची लागवड केली. दीड एकरात लागवड करीत सुमारे 60 हजार रुपये कमावले. तर दुसरीकडे गेल्या 12 वर्षांपासून ही शेती करीत असलेले मेहकर (जि. बुलडाणा) तालुक्यातील नायगाव दत्तापूर येथील राजराम पुंजाजी निकम यांनी बाजारातील संधी पाहता याच हंगामात दुसऱ्यांदा लागवड केली. पहिल्या टप्प्यात १० एप्रिलला दोन एकरात लागवड करीत या क्षेत्रातून सुमारे २०० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळवले.  त्याला सरासरी १० ते १२ रुपयांचा भाव मिळाला.  आता पुन्हा जुलै महिन्यात केळीच्या पिकामध्ये त्यांनी काशीफळाचे आंतरपीक लावले आहे.

सणासुदीतील महत्वाची आवश्यक भाजी 
पावसाळ्यात पालेभाज्यांचे प्रमाण कमी होत असल्याने ज्या पालेभाज्या मिळतात त्यांचे दरही वाढलेले राहतात. अशा वेळी गल्ली बोळात, गावांमध्ये होणाऱ्या भंडाऱ्यांच्या कार्यक्रमात तयार होणाऱ्या महाप्रसादात काशीफळाचा भाजीसाठी वापर सर्रास केल्या जातो. कुठल्याही भंडाऱ्याच्या सोहळ्यात काशीफळाची भाजी राहतेच. शिवाय घरोघरीसुद्धा पावसाळ्याच्या दिवसात भाजी म्हणून काशीफळाला पसंती मिळते. लवकर खराब न होणारे हे फळ आहे.  फळाला वरुन टणकपणा असल्याने साठवणुक करण्यासही सोईचे असते. त्यामुळे काही शेतकरी दरवर्षी या फळाची हंगामी लागवड करून चांगला पैसा मिळवत आहेत.

कमी खर्चाचे पीक
वेलवर्गीय पिकाला इतर पिकांप्रमाणे खत, किडनाशकांचा भडीमार करावा लागत नाही. काही शेतकरी लागवडीच्यावेळी डीएपीचा एक डोज देतात. त्यानंतर केवळ बुरशीनाशकांची फवारणी काढतात. याशिवाय पिकावर इतर फार खर्च लागत नसल्याचे शेतकरी सांगतात. या वेलांवर केवळ बुरशीनाशकाची गरजेनुसार दोन वेळा फवारणी करावी लागते. याशिवाय मशागत, मजुरी, वाहतुक वगळता इतर कुठलाही खर्च होत नाही. पावसाळ्यात एवढ्या लवकर येणारे व चांगला पैसा मिळवून देणारे पीक नसल्याचेही शेतकरी सांगतात.

पहिला अनुभव उत्साह वाढविणारा
यंदा प्रथमच लागवड करणारे अतुल आखरे यांनी तर संपुर्ण सेंद्रीय पद्धतीने उत्पादन घेतले. रासायनिक खताचा एक दाणाही दिला नाही. त्यामुळे एकरी अवघा दहा हजारांच्या आत खर्च
लागला तर एकूण उत्पादन 72 हजार रुपये मिळाले. त्यांना 60 हजार रुपये निव्वळ नफा मिळाला. या नव्या पीकपद्धतीबाबत अतुल यांना पंदेकृविमध्ये कार्यरत असलेली पत्नी डॉ. आम्रपाली
आखरे, शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत नेमाडे, नितीन इंगळे यांच्यासह प्रदीप पाटील, प्रशांत ताथोड, महेंद्र काळे या शेतकऱ्यांनी मार्गदर्शन केले. त्यातून नवे पीक चांगल्या पद्धतीने घेतल्याचे अतुल
सांगतात. यावेळी काही चुकाही झाल्या. परंतु त्या सुधारून पुढील हंगामात अधिक चांगल्या पद्धतीने काशीफळ घेणार असल्याचेही ते म्हणाले.

निकम यांचे काशीफळात सातत्य
नायगाव दत्तापूर येथील राजाराम निकम हे गेली 10 ते 12 वर्षे ही शेती करीत आहेत. एप्रिल महिन्यात रखरखत्या उन्हात त्यांच्याकडे ही लागवड केली जाते. या काळात लागवड केली तर
वेळेवर फळे मिळतात व बाजारपेठेतील दर कॅच करता येतो, असा त्यांचा आजवरचा अनुभव आहे.  उन्हाळयात केली जाणारी ही लागवड मोठा कसरतीचा काळ असतो. पिकाला या
काळात भरपूर पाण्याची गरज राहते. जमिनीतील आर्द्रता टिकून राहण्यासाठी वेगवेगळे उपाय ते यासाठी करतात. पाऊस पडून एकदा उष्णतामान कमी झाले की बरीच चिंता मिटून जाते,
असे ते सांगतात. गेल्या दहा बारा वर्षातील अनुभवाच्या जोरावर आता निकम हे दरवर्षी दोन ते चार एकरापर्यंत ही लागवड करतात व चांगले उत्पादन काढून उत्पन्न मिळतात.  खरीपातील
इतर कुठल्याही हंगामी पिकापेक्षा काशीफळापासून त्यांना चांगले पैसे मिळतात.

बाजारपेठेत मागणी राहणारे फळ
काशीफळाला या भागातील सर्वच बाजारपेठांमध्ये मागणी राहते. त्यातही अकोल्याच्या बाजारपेठेत पावसाळ्यात शेकडो क्विंटल काशीफळाची उलाढाल होत असते. दररोज ट्रॅक्टर ट्रॉली

भरून फळे येतात आणि त्याच दिवशी ही फळे व्यापाऱ्यांकडून बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जातात. हंगामात सुरुवातीला आठ रुपयांपासून किलोला दर मिळाला.

गणेशोत्सवाला प्रारंभ, ज्येष्ठा गौरींचे आगमनाची चाहूल लागताच हा दर किलोला 12 ते 13 रुपयांपर्यंत पोचला. यातून शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळाला, असे येथील व्यापाऱ्यांकडून सांगण्यात

आले. वऱ्हाडात अकोला, खामगाव, मालेगाव, वाशीम सह इतर छोट्या-मोठ्या बाजारपेठांमध्ये चांगली मागणी राहते. प्रामुख्याने पावळ्यात मिळणारे हे फळ इतर पालेभाज्यांची कमतरता भासू देत नाही.

इतर पिकांसाठी शेत होते उपलब्ध
एप्रिल-मे महिन्यात लागवड केल्यानंतर जुलै-ऑगस्टमध्ये फळांची काढणी संपते. त्यानंतर साधारणतः महिनाभर शेताला तयार करण्यासाठी वेळ मिळतो. यानंतर शेतकरी त्यात सरळ
रब्बीतील हरभऱ्याची लागवड करतात. एकाच शेतात काशीफळ, हरभरा आणि पाण्याची सोय असेल तर उन्हाळी पीक, असे तीन पिके काढता येतात. दोन पिके तर बहुतांश शेतकरी घेत
असतात.

 

  • एकरी उत्पादन- सरासरी ८० ते १३० क्विंटल
  • लागणारा खर्च-  २० ते२५ हजार (रासायनिक)
    १० हजार (विना रासायनिक)
  • मिळणारा दर- सरासरी आठ ते १२ रुपये
  • एकरी उत्पन्न- ५० हजारांपेक्षा अधिक

 

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola news During the festival, Kashiphal gives a special rate