अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीमूळे जिल्हा परिषदेची सभा पुढील महिन्यात

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 November 2020

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर झाल्याने सध्या अकोला जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू आहे. परिणामी जिल्हा परिषदेची विशेष सभा घेतल्यास त्यामध्ये सत्ताधाऱ्यांना हिताचे निर्णय घेता येणार नाहीत.

अकोला  ः अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर झाल्याने सध्या अकोला जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू आहे. परिणामी जिल्हा परिषदेची विशेष सभा घेतल्यास त्यामध्ये सत्ताधाऱ्यांना हिताचे निर्णय घेता येणार नाहीत.

त्यामुळे आता जिल्हा परिषदेची नियमित सर्वसाधारण सभा डिसेंबर महिन्याच्या पाच ते दहा तारखेला होण्याची शक्यता आहे. सभेत सत्ताधारी आणि विरोधकांकडून ठराव सादर करण्यात येणार असल्यामुळे सभेच्या विषयांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आर्थिक वर्ष संपण्यासाठी जेमतेम चारच महिने शिल्लक राहिल्याने जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून राबविण्यात येणाऱ्या योजना प्रभावीपणे मार्गी लावण्याचे आव्हान सत्ताधारी वंचित बहुजन आघाडी आणि प्रशासनासमोर आहे.

त्यातच जिल्हा परिषदेत गत काही दिवसांपासून कुरघोडीचे राजकारण सुरू असल्यामुळे सत्ताधारी व विरोधकांमध्ये खटके उडत आहेत. सत्ताधाऱ्यांकडून मंजुर करण्यात आलेल्या ठरावांवर स्थगिती आणण्याचे काम विरोधकांनी केल्यामुळे सत्ताधारी व विरोधकांमधील दूरी वाढल्याचे दिसून येत आहे. दरम्यान आता

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने आर्थिक, विकास आणि धाेरणात्मक निर्णय घेण्यावर सभेवरही मर्यादा आली आहे. त्यामुळे आता सभेबाबत प्रशासनाकडून मार्गदर्शन घेण्यात येत आहे.

विषय पत्रिकेवर राहणार हे विषय
जिल्हा परिषदेच्या १४ सप्टेंबर राेजी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक विषयांचा समावेश हाेता. यात भांबेरी येथे प्राथमिक आराेग्य केंद्र स्थापन करणे, कान्हेेरी सरप येथी ग्रामपंचायत इमारत पाडणे, स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषदस्तरीय जैविक विविधता व्यवस्थापन समिती पुर्नगठण- स्थापन करणे, समाज कल्याण विभागातर्फे दुधाळ जनावरांच्या वितरणाला तांत्रिक मंजुरी देणे आदींचा समावेश हाेता. मात्र नंतर हे ठराव विभागीय आयुक्तांनी विराेधकांच्या याचिकेवरुन फेटाळले हाेते. त्यामुळे आता येणाऱ्यासभेत या विषयांसह विराेधकांकडूनही काही ठराव मांडले जाण्याची शक्यता आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Election Zilla Parishad meeting of Amravati division teachers constituency next month