विनामास्क सुटले सुसाट, पोलिसदल कर्तव्य निभावतेय शहराबाहेर

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 24 October 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने सामुहिक संसर्ग थांबविण्यासाठी काही उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये मास्क बांधणे बंधनकारक असताना वाशीम शहरात मात्र विनामास्क फिरणाऱ्यांनी हैदोस घातला आहे.

वाशीम :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने सामुहिक संसर्ग थांबविण्यासाठी काही उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये मास्क बांधणे बंधनकारक असताना वाशीम शहरात मात्र विनामास्क फिरणाऱ्यांनी हैदोस घातला आहे.

चौकात कर्तव्यावर असलेले पोलिस दिवसातून तीन ते चार तास कर्तव्य निभावत आहेत. त्यामध्ये त्यांच्या कर्तव्याच्या काळात दिसेल त्याला दंड अन्यथा कारवाई थंड, असे चित्र असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाने तोंडावर मास्क बांधणे बंधनकारक आहे. दुचाकी वाहनावर प्रवास करताना किंवा सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेने प्रवास करतांना मास्क आवश्यक आहे.

मात्र वाशीम शहरातील नागरीकांनी मास्कबाबत असहकार पुकारला की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. वाशीम शहरातील प्रत्येक चौकात शहर पोलिस व वाहतूक शाखेच्या शिपायाची ड्युटी आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत व सायंकाळी चार वाजतापासून विनामास्क कारवाया केल्या जातात. इतर वेळी मात्र शहरात कोणीच थांबवत नसल्याने अपवादाने मास्कधारी दिसतात.

कर्तव्याच्या काळात पोलिसांपेक्षा होमगार्ड जास्त आक्रमक होतात हे चित्र आहे. यावेळात बोलण्यासाठी तोंडावरून मास्क काढला तरीही त्याला ५०० रूपयांचा दंड ठोठावला जातो. इतर वेळी मात्र शहरात विनामास्क धारकांचा मुक्त संचार असतो.

विनामास्क अन् तेही ट्रिपलसीट
शहरामध्ये विनामास्क फिरणारे दुचाकीस्वार सुसाट असताना वाशीम शहरात ट्रिपलसीट वाहने भरधाव वेगाने पळविण्याचे प्रकार जोरात आहेत. ही बाब पाटणी चौकात जास्त प्रमाणात आढळून येते. शहर पोलिस व वाहतूक शाखेच्या शिपायांनी ही बाब गंभीरतेने दखल घेण्याजोगी आहे.

प्रादुर्भाव वाढण्याची भीती
शहरामध्ये तोंडाऐवजी गळ्यात मास्क अडविण्याची फॅशन आली आहे. मोठ्या व्यापारी प्रतिष्ठानामध्ये प्रचंड गर्दी होत आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची पायामल्ली व्यापाऱ्यांकडूनच केली जात आहे. प्रशासनाने यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: fast driving escaped unharmed, police force on duty outside the city