
Akola News : अकोल्यात निघाली दोन हजारच्या नोटेची अंतिम यात्रा; नोटबंदीच्या निर्णयाचा केला निषेध
अकोला : दोन हजाराची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) घेतल्यानंतर या निर्णयाचा निषेध म्हणून बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अकोला शहरात दोन हजाराच्या नोटेची प्रतिकात्मक अंतिम यात्रा काढण्यात आली. गांधी चौकात हे आंदोलन करीत सरकारच्या नोटबंदी निर्णयाचा निषेध केला.
केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे दोन हजार रुपयांची नोटबंदी करून देशातील नागरिकांना त्रास देण्याचा हा शासनाचा मानस असल्याचा आराेप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या नेतृत्वात दाेन हजारच्या नाेटीची अंतिम यात्रा काढण्यात आली. आंदोलनात जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, माजी आमदार तुकाराम बिडकर, डॉ. आशा मिरगे, वानखडे, विजय उजवणे, करण दौड आदी सहभागी झाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलकांनी हातात फलक घेत केंद्रातील भाजपप्रणित मोदी सरकारवर निशाणा साधला. यात फक्त सात वर्षांचा प्रवास-भावपूर्ण श्रद्धांजली, दोन हजाराची नोट बाय-बाय, बीजेपी सरकार हाय-हाय, वारे राजा तुझे धाेरण, साडे पाच वर्षातच आले मरण, सुशिक्षित पंतप्रधान देशाची गरज, आदी घोषणांचा समावेश होता.
दोन हजाराच्या नोटेची प्रतिकात्मक अंतिम यात्रेला स्वराज्य भवन येथून प्रारंभ झाला. यात्रा मदनलाल धिंग्रा चाैक (मध्यवर्ती बस स्थानक), गांधी राठोड, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह, महानगरपालिका कार्यालयासमाेरून गांधी चाैकात समाराेप करण्यात आला.