बंद मंदिरासमोर प्रदक्षिणा घालून भाविकांनी पटवून दिली अस्तित्वाची साक्ष

akola news on gajanan maharaj shegaon prakat din
akola news on gajanan maharaj shegaon prakat din

मी गेलो ऐसे मानू नका....भक्तीत अंतर करू नका...!

अकोला : संतांचे कलेवर जरी या जगात आज नसले तरी संतांच्या लीलांचा कार्यानुभव  तिचा अवशेष या भूतलावरती सूक्ष्म स्वरूपामध्ये कार्यरत राहतो. संतांचा जगणं आणि त्यांनी केलेल्या लीला व त्यांचे एकूणच  अवतार कार्य हे जगासाठी नेहमीच प्रेरणादायी आहे. आपल्या प्रत्येक कृतीतून ते जगाला जगण्याचा एक नवीन संदेश देत असतात. एक नवीन उमेद निर्माण करीत असतात. आणि या संसार तापत्रयी च्या व्याधीतून प्रत्येकाला मुक्त करीत असतात. त्यामुळे खऱ्या भक्तांना  आपल्या जगण्याची एक दिशा प्राप्त होते. महाराष्ट्रातील अध्यात्माचे कळस संत तुकाराम महाराज आपल्या येण्याचे कारण विशद करतात -

आम्ही वैकुंठवासी।  आलो याचि कारणासी।।

 बोलिले जे ऋषी । भावे साच  वर्ताया।। 

आड रानी भरले जग।  झाडू संतांचे मार्ग ।।

अशा प्रकारचा संदेश संतांनी या भूतलावर येण्याचा व्यक्त केलेला आहे. आपल्या जगण्याची कारण संतांनी अतिशय स्पष्टपणे व्यक्त केली आहेत. संताच्या जगण्याचा  धर्म निश्चितअसल्याने त्यांनी पूर्ण जगाची काळजी वाहली आहे.

विष्णु मय जग । वैष्णवांचा धर्म ।।

भेदाभेद भ्रम अमंगळ।।

 असा त्यांनी कोणत्याही गोष्टीत भेद न करता संतांची अभेद्य दृष्टी या जगाच्या कल्यानासाठी, उत्कर्षासाठी 

कोणाही जीवाचा न घडो मत्सर।

वर्म सर्वेशवर पूजनाचे ।।

 संत गजानन महाराज   महाराष्ट्राची विदर्भ पंढरी शेगाव येथे माघ वद्य सप्तमीला प्रगट होऊन ऋषीपंचमी या तिथीला या जगातून  अंतर्धान पावले. पण जातांना त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला आहे. जरी मी या जगातून अंतर्धान पावतो तरी..

 मी गेलो ऐसे मानू नका।  भक्तीत अंतर करू नका

मला कदापि विसरू नका।। मी आहो येथेच ।।

 भक्तांना हा महत्त्वाचा संदेश त्यांनी दिलेला आहे की मी याच ठिकाणी आजही आहे तसाच आहे फक्त तुमच्या अनुभूतींचा चक्षुना तुम्हाला मला अनुभवता आले पाहिजे. आणि  संत भक्तगण सांगतात  जर आपण भक्तीच्या  अंतकरणाने संत गजानन पाहिले तर आजही त्यांच्या असण्याची अनेक दृष्टांत, सिद्धांत आपल्या ला अनुभव मिळतात. संत गजाननाचे अवतारकार्य हे त्यांच्या जीवन कालखंडामध्ये अतिशय महत्त्वाचे ठरतात. त्यांच्या लीलांचा जगाला आलेला अनुभव हा सुद्धा खूप महत्त्वपूर्ण ठरतो.

 शेगावी माघमासी । वद्य सप्तमी त्या दिवशी।।

हा उदय पावला ज्ञान राशी ।पदनताते तारावया।।

 असा हा  ज्ञानराशी  सर्व पतीताना  पावन करण्यासाठी, जगाचा उद्धार करण्यासाठी माझ्या अवतारकार्य आहे. असा संदेश त्यांनी दिलेला आहे आणि त्याचे वर्णन संत दासगणू महाराज यांनी श्री गजानन विजय ग्रंथामध्ये केलेला आहे आपल्या जगण्याचं जे  तत्त्व आहे त्यामध्ये म्हणजे आत्मा म्हणजे गण तत्व असून दुसरा जीव हे ब्रम्ह तत्व आहे. ते एक असून त्यामध्ये कोणताही भेद नाही. हे महत्त्वाचं तत्वज्ञान  त्यांनी आपल्या प्रसिद्ध भजनातून मधून मधून ते सांगत असतात. गण गण हे त्यांचे भजन हमेशा चालले म्हणून गजानन हे त्याना नाव पडले. संतांच्या येण्याची कारणे निश्चित आहेत. आल्यानंतर त्यांचं अस्तित्व आहे ते कोणत्या स्वरूपात आहे तर निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी । स्थिरचर व्यापून उरले ते या जगताशी।। ते तू तत्व  खरोखर निसंशय असशी।।

लीला मात्रे धरिले मानवदेहाशी।। देह धारण करून ते ब्रम्ह तत्व आपल्या जगण्याचा मूळ स्वरूप आहे असे प्रतिपादन गजानन महाराजांची आरती  मध्ये दासगणु महाराजांनी केले आहे.

आपली निष्ठा असेल आणि आपला संतांच्या अवतार कार्य वरती विश्वास असेल तर आपल्या मनातील शंका कुशंका यांना थारा राहात नाही.

 गजाननपदी आपली निष्ठा ठेवा ।।

सुखद अनुभव सर्वदा घ्यावा ।।

मी गेलो ऐसे मानू नका। भक्तीत अतर करू नका।। कदा मजलागी विसरू नका। मी आहे येथेच . संत गजानन महाराज या जगात कल्याणाच्या दृष्टीने मानव देहधारी एक अवलिया हे शेगांव गावांमध्ये प्रकट होऊन आपल्या प्रकट दिनानिमित्त विविध लीला करतात. त्यामध्ये कोरड्या विहीरीला पाणी आणण्याची लीला असेल, वठलेल्या आंब्याला पाने  आणण्याची  लीला असेल अन्यथा  जानराव देशमुखांची व्याधी हरून मरणाच्या दाढेतून बाहेर काढण्याचा प्रसंग असेल .ह्या सर्व लीला गजानन प्रसाद मानलं तर त्याला कार्यकारणभाव कथा  ठरतात व त्यावरती विश्वास ठेवून पुढे आल्यास त्या प्रकारचे अनुभव भक्तांना आजही सदोदित येत असतात. श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव  संस्थांनच्या ब्रीद वाक्य नुसार सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे भवन्तु सुखिनः या तत्त्वानुसार कार्य करीत असतांना त्यांनी आज जे लोकहिताची कामे संस्थांच्या माध्यमातून हाती घेतली आहेत आणि त्यात कार्याला येत असलेली अपार कार्यसिद्धी गजाननाचे अस्तित्व अधोरेखित करते.  सेवा परमो धर्म:।।

 या तत्त्वानुसार त्याचा सर्वसामान्य भक्तांना मिळत असलेला फायदा यातून हेच सिद्ध होते की महाराजांचे अस्तित्व महाराजांचे जीवन कार्य आजही या शेगाव नगरिष भूतलावर अवतार कार्य सुरू आहे आणि या कार्याचा अनुभव  अनेकांना येत आहे. ते कार्य प्रत्येकाने सेवाकार्य म्हणून समजून घेतले तर त्यांच्या जीवनामध्ये कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास वाटतो .म्हणून संतांचे येणे हे  संत कारणाने येतात आणि संताची कार्यसिद्धी पूर्ण करून या जगातून आपले कलेवर  घेऊन जातात. पण त्यांच्या कार्य सिद्धता त्यांच्या जीवनातुन  प्रकट होत असते. संत जी लीला करतात त्या  जणू काही एखादी आई आपल्या मुलाला या जगामध्ये चालयला शिकवतात ,अगदी त्याच प्रमाणे त्यांचे कार्य जगाला तत्वांचे अनुभूती देऊन शिकवत असतात. संत तुकाराम महाराज म्हणतात- अर्भकाचे साठी। पंते हाती धरली पाटी। तैंसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी।।

बालकाचे चाली माय पाऊल घाली।। तुका म्हणे नाव उदका धरनी ठाव।। अशा प्रकारचे वर्तन असते आणि त्यांच्या लीला असतात .संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात- येथ वडील जे जे करती। त्या नामु धर्म ठेविती।। 

संतांनी जगाला योग्य मार्ग दाखवून अवतार कार्य केले आहे. त्यांच्या अवतार कार्याचा अनुभव आजही येत असतो. आज कोरोनाच्या या आरोग्य संकट काळात मंदिर जरी बंद असले तरी तो गजानन येथेच आहे म्हणून आजही लोक बंद मंदिरासमोर प्रदक्षिणा घालून त्यांच्या अस्तित्वाची साक्ष पटवून देताना  प्रत्यक्ष दररोज दिसतात. यातून एकच भाव सार्थ ठरतो..गजाननाच्या अद्भुत लीला। अनुभव येतो आज मितीला।। जाऊनि गजानना। दुःख त्या ते करी कथना।।

जय गजानन...!

प्रा.डॉ.हरिदास आखरे

श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालय दर्यापूर,

जि. अमरावती

७५८८५६६४००

ई-मेल hdakhare@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com