‘हळदी’पेक्षाही ‘आले’ बरे!, कमी खर्चात अधिक उत्पन्नाचा शाश्‍वत पर्याय; जिल्ह्यात वाढले पेरणी क्षेत्र

अनुप ताले  | Monday, 7 December 2020

पारंपरिक पिकाला फाटा देत अकोलेकरांनी मसाला पिकांना पसंती द्यायला सुरुवात केली. त्यामुळेच जिल्ह्यात हळदीचा पेरा सुद्धा वाढला. परंतु, आता हळदीपेक्षाही आल्याच्या (अद्रक) पिकाला शेतकऱ्यांकडून पसंती मिळत असून, त्याच झपाट्याने आल्याचे पेरणीक्षेत्र अकोल्यात वाढलेले दिसत आहे.  

अकोला : पारंपरिक पिकाला फाटा देत अकोलेकरांनी मसाला पिकांना पसंती द्यायला सुरुवात केली. त्यामुळेच जिल्ह्यात हळदीचा पेरा सुद्धा वाढला. परंतु, आता हळदीपेक्षाही आल्याच्या (अद्रक) पिकाला शेतकऱ्यांकडून पसंती मिळत असून, त्याच झपाट्याने आल्याचे पेरणीक्षेत्र अकोल्यात वाढलेले दिसत आहे.

दुष्काळ, अतिवृष्टी, पावसाचा लहरीपणा, हवामानातील बदल, किडींचा प्रादुर्भाव इत्यादी कारणांनी जिल्ह्यातील शेतकरी गेली कित्येक वर्षापासून नुकसान सोसत आहे. त्यातही सोयाबीन, तूर, मूग, उडीद, हरभरा, कापूस या पारंपरिक पिकांपासून खर्च अधिक आणि उत्पन्न कमी अशी गती होत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत गेली आहे.

या परिस्थितीवर मात करण्यासाठी कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्याच्या पर्याय शेतकऱ्यांना सूचवाला जात असून, त्याबाबतचे संशोधनही नित्य सुरू आहे. परंतु, पारंपरिक पिकांना फाटा देत नवीन त्यातही मसाला पीक उत्पादन घेतल्यास कमी खर्चात अधिक व शाश्‍वत उत्पन्न घेता येत असल्याचे अकोल्यासह विदर्भातील शेतकऱ्यांना लक्षात आले.

Advertising
Advertising

त्यामुळे गेल्या काही वर्षात हळद, ओवा, धणे, मोहरी इत्यादी मसाला पिके घेण्यास येथील शेतकऱ्यांनी सुरुवात केली. त्यातही कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न देणारे पीक म्हणून हळदीचा पेरा झपाट्याने वाढला. आता मात्र आले (अद्रक) पीक हा हळदीपेक्षाही शाश्‍वत व अधिक उत्पन्न देणारा पर्याय शेतकऱ्यांना सापडला असून, त्यामुळे जिल्ह्यात आल्याचे लागवड क्षेत्र सुद्धा झपाट्याने वाढत आहे. यावर्षी सुद्धा जवळपास १५० ते २०० हेक्टरवर आल्याची लागवड करण्यात आली आहे.

या वाणांना अधिक पसंती
अकोल्यासह विदर्भातील शेतकऱ्यांनी आले लागवडीसाठी ‘माहिम’ आणि ‘रेओ-डी-जानरो’ या दोन वाणांची निवड केली असून, त्यातही ‘माहिम’ या वाणाची सर्वाधिक लागवड करण्यात आली आहे.

येथून बेण्यांची उपलब्धता
आले (अद्रक) लागवडीसाठी सिल्लोड, फुलउंबरी, औरंगाबाद, या भागातून मोठ्या प्रमाणात बेणे खरेदी केले जातात. शिवाय बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर, लोणार या पट्ट्यातून सुद्धा बेणे घेतले जातात.

हळदीपेक्षा आले सरस का?
‘आले’ हे आठ ते नऊ महिन्यात निघणारे पीक आहे. शिवाय सुंठीपेक्षा ओल्या आल्याची विक्री मोठ्याप्रमाणात होत असल्याने हळदीसारखे काढणीनंतर उकळणे, सुकविणे, अशी प्रक्रिया न करता काढणीनंतर थेट विक्रीसाठी आल्याचे पीक तयार असते. त्यामुळे या पिकाचे वजन अधिक भरते व उत्पन्न सुद्धा कमी वेळेत, कमी खर्चात अधिक मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने हळदीपेक्षा आल्याचे पीक सरस ठरत आहे.

साठवणुकीला पर्याय
पीक साठवणुकीची शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठी समस्या असते. मात्र आले (अद्रक) पिकाला जेंव्हा भाव असेल तेव्हा काढून ते विक्रीसाठी नेणे किंवा भाव नसल्यास जमिनीतच राहू देण्याचा म्हणजे साठवणुकीचा प्रर्याय शेतकऱ्यांकडे उपलब्ध असतो. उलट जेवढे दिवस पीक जमिनीत राहील तेवढे दिवस उत्पादन अधिक मिळण्याची शाश्‍वती असते.

मध्यम व भारी जमिनीमध्ये सरी वरंबा पद्धतीने आल्याची लागवड करावी. आल्याचे पीक घेताना योग्य पाणी व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचे असून, बीज प्रक्रिया करणे सुद्धा आवश्‍यक ठरते. सध्या अकोला जिल्ह्यासह वऱ्हाडात आले पीक लागवड क्षेत्र वाढत आहे व त्यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न सुद्धा मिळत आहे.
- गजानन तुपकर, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र अकोला

(संपादन - विवेक मेतकर)