सरकारने कोचिंग क्‍लास चालविणाऱ्यांचा अंत पाहू नये, आठ महिन्यांपासून खाजगी शिकवणीवर्ग चालक झाले बेहाल

सकाळ वृत्तसेेवा | Thursday, 10 December 2020

यावर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोना संकट आले आणि तेव्हापासून संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झाले होते. मात्र, त्यातून हळुहळू समाजाच्या सर्वच क्षेत्रात योग्‍य सावधगिरी बाळगत आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत होत आहेत व झाले आहेत.

अकोला : यावर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोना संकट आले आणि तेव्हापासून संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झाले होते. मात्र, त्यातून हळुहळू समाजाच्या सर्वच क्षेत्रात योग्‍य सावधगिरी बाळगत आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत होत आहेत व झाले आहेत.

अगदी नववी ते बारावीपर्यंतच्या शाळाही सुरू झाल्‍या आहेत. मात्र, सरकारने अद्यापही खासगी ट्युशनक्‍लास चालकांना वर्ग सुरू करण्याची परवानगी न दिल्‍याने पश्चिम विदर्भातील हजारो ट्यूशनक्‍लास चालक, त्यांचे परिवार आणि या ट्यूशनक्‍लासच्या भरवशावर चालणाऱ्या इतर व्यवसायातील हजारो परिवारांवर आज उपासमारीची पाळी आली आहे. दारूच्या दुकानांपासून शाळेपर्यंत सर्व व्यवहार सुरळीत सुरू करण्यास परवानगी देणारे सरकार खासगी ट्यूशनक्‍लास चालक आणि या शिकवणी वर्गांवर अवलंबून असलेल्‍या हजारो परिवारांच्या तोंडचा घास का हिरावून घेत आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया आता उमटू लागली आहे.

अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वाशीम या पाचही जिल्ह्यांत हजारो उच्चशिक्षित तरुण-तरुणींनी सरकारी नोकरीची अपेक्षा न ठेवता आपल्या ज्ञानाच्या हिमतीवर खाजगी ट्यूशन क्‍लासेस सुरू केले. विद्यार्थ्यांना आपल्‍या ज्ञानाचा फायदा करून देतानाच आपला व आपल्‍या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी या उच्चशिक्षितांनी हा राजमार्ग अवलंबला. आपला आणि आपल्‍या परिवाराचाच विचार न करता परिसरातील इतरही शिक्षकांना आपल्‍यासोबत जोडून त्यांच्याही उदरनिर्वाहाची व्यवस्था केली. सोबतच ऑफिस स्टाफ, नॉन-टीचिंग स्टाफ अशा हजारो परिवारांना सन्मानाने जीवन जगण्याचा मार्ग या ट्यूशनक्‍लास चालकांनी उपलब्‍ध करून दिला आहे, यात शंका नाही.

Advertising
Advertising

या प्रत्येक गावात दूरदुरून शिकण्यास आलेल्‍या विद्यार्थ्यांच्या राहण्या-जेवण्याची व्यवस्था उभी राहिली. या व्यवसायातही आज हजारो कुटुंबांची उपजीविका चालते आहे. मात्र, कोरोना संकटामुळे अशा लक्षावधी कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न उभा झाला आहे. आता राज्‍य शासनाने शाळा, मंदिरे, व्यायामशाळा, दारूची दुकाने, बार आदींना सुरू करण्याची परवानगी दिली आहे, तर ट्यूशनक्‍लास चालकांनाही योग्‍य त्या नियम-अटींवर ज्ञानदान करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी खाजगी ट्यूशनक्‍लास चालक करीत आहेत.

खासगी ट्यूशनक्‍लास चालक विद्यार्थ्यांकडून शुल्‍क घेतात, असे सर्वत्रच बोलले जाते. मात्र, परिस्थितीने गांजलेल्‍या अनेक विद्यार्थ्यांचा सर्व खर्च खाजगी ट्यूशनक्‍लास चालकांनी उचलल्याची हजारो उदाहरणे आहेत. ट्यूशनक्‍लास चालकांच्या मदतीने उच्चशिक्षणासाठी विदेशात गेलेल्‍या विद्यार्थ्यांची संख्याही बरीच मोठी आहे. मग, ट्यूशनक्‍लासेसबाबत राज्‍य शासन का दुजाभाव ठेवत आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. खासगी ट्यूशनक्‍लास चालकांचे परिवार आहेत, त्यांच्याही कौटुंबिक, सामाजिक गरजा आहेत. खासगी ट्यूशनक्‍लास चालक, त्यांचे परिवार आणि या ट्यूशनक्‍लासवर अवलंबून हजारो परिवारांच्या आजच्या दीनवाण्या परिस्थितीचा राज्‍यशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे. ज्‍याप्रमाणे राज्‍य शासनाने नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग नियम व अटी पाळून सुरू करण्याची परवानगी शाळा-महाविद्यालयांना दिली त्याच धर्तीवर राज्‍यातील खाजगी ट्यूशनक्‍लास चालकांनाही काही नियम व अटींसह ट्यूशनक्‍लास सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.

कुठल्याही प्रकारच्या शासकीय मदतीची अपेक्षा न ठेवता अनेक उच्चशिक्षित, मेहनती, प्रामाणिक लोकांनी सामाजिक बांधिलकी जपत खाजगी ट्यूशनक्‍लासेसना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेसोबतच या खाजगी ट्यूशनक्‍लासेसनीही मोलाची मदत केली आहे, हे गेल्‍या काही वर्षांच्या निकालावर नजर टाकली असता लक्षात येते. खाजगी ट्यूशनक्‍लास चालकांनी अनेक गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी मदतीचा हात देत त्यांना त्यांच्या पायावर उभे केले आहे. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरसाठी मोलाची मदत करणाऱ्या ट्यूशनक्‍लासेसना सुरू करण्याची परवानगी राज्‍य सरकारने द्यावी, अशी मागणी होत आहे.
-प्रा. नितीन बाठे, श्री समर्थ एज्‍युकेशन, अकोला

(संपादन - विवेक मेतकर)