
शहरात हेल्मेट सक्तीचा निर्णय दिवाळीपर्यंत पुढे ढकलण्यात आला असला तरी शुक्रवारपासून (ता.६) राज्य व राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट सक्तीला सुरुवात करण्यात आली.
अकोला ः शहरात हेल्मेट सक्तीचा निर्णय दिवाळीपर्यंत पुढे ढकलण्यात आला असला तरी शुक्रवारपासून (ता.६) राज्य व राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट सक्तीला सुरुवात करण्यात आली.
अकोला शहरात दाखल होणाऱ्या राज्य व राष्ट्रीय महामार्गावर शहर वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली. त्यासोबतच हेल्मेट घालणाऱ्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कारही करण्यात आला.
जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी शुक्रवारपासून अकोला शहर वगळता जिल्ह्यात राष्ट्रीय व राज्य महामार्गावर हेल्मेट सक्ती जाहीर केली होती. अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता दुचाकी स्वारांना हेल्मेट बंधनकारक करण्यात आले होते
. नंतर शहरातील सक्तीचा निर्णय दिवाळीपर्यंत स्थगित करण्यात आला. शहर वगळता राज्य व राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट सक्तीला शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली.
अकोला शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके, पोलिस उपनिरीक्षक सुरेश वाघ यांच्या नेतृत्वात शहरा लगतच्या राष्ट्रीय व राज्य महामार्गावर एकाच वेळी विना हेल्मेट दुचाकी स्वारांविरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली. सकाळपासूनच शहर वाहतूक शाखेचे कर्मचाऱ्यांनी शहराच्या जवळील महामार्गावर ही कारवाई सुरू केली.
कारवाई करताना काही दुचाकी चालक हेल्मेट घातलेले सुद्धा आढळून आले. त्यांचा जागरूक नागरिक म्हणून गुलाबपुष्प देऊन पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांनी सत्कार केला. त्यातील बरेच चालक जेव्हापासून दुचाकी खरेदी केली तेव्हापासूनच हेल्मेटचा वापर करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांचे जागरूकते बद्दल पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांनी आभार व्यक्त करून त्यांचा सत्कार केला.
अनेकांनी घातला वाद
हेल्मेट सक्तीच्या निर्णयाबाबत अनेकांनी वाहतूक पोलिसांसोबत वादही घातला. अकोला शहरात हेल्मेट बंदी नसल्याने शहरात दाखल होताना सक्ती कशासाठी केली जात आहे, म्हणून अनेक जण पोलिसांशी वाद घालताना आढळून आले. वाद घातल्यानंतरही पोलिसांकडून सक्तीने दंडात्मक कारवाई केली जात आहे.
५०० रुपये दंड
हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारला जात आहे. अनेकांकडे वाहन चालविण्याचा परवानाही नसल्याने त्यात २०० रुपये दंडाची भर पडत आहे.
त्यामुळे दिवाळी सणापूर्वीच दुचाकी स्वारांच्या खिश्याला मोठा फटका बसत आहे. अनेकांकडे रोख रक्कम भरण्यासाठी पैसे नसल्याने ‘अनपेड’ करून पोलिसांनी दुचाकीस्वारांना दिलासा दिला. मात्र अनपेड पावती फाडणाऱ्यांना ही दंडाची रक्कम भरणे आवश्यक आहे. अन्यथा पुढच्या कारवाईच्या वेळी गाडी जप्तीच्या कारवाईला सामोरे जावे लागते.
कारवाईचे अर्धशतक
विना हेल्मेट राज्य व राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी चालविणाऱ्यांविरुद्ध शुक्रवारी सकाळपासूनच कारवाई करण्यात आली. दिवसभरात एकूण ५० दुचाकीस्वारांवर शहर वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांनी दिली.
तालुका स्तरावरही कारवाई
तालुका स्तरावरही तेथील पोलिसांनी राष्ट्रीय व महामार्गावर दुचाकी स्वारांविरुद्ध विना हेल्मेटची कारवाई सुरू केली आहे. कारवाईचा पहिलाच दिवस असल्याने अनेक दुचाकीस्वारांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे.
कारवाईची मोहीम राष्ट्रीय व राज्य महामार्गावर सातत्याने सुरूच राहील. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करून सहकार्य करावे. जे दुचाकी वाहनधारक हेल्मेट वापरणार नाहीत, त्यांना अप्रिय कारवाईला सामोरे जावे लागले.
- गजानन शेळके, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा
(संपादन - विवेक मेतकर)