सिंचनाच्या अडचणी वाढणार; शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड

सकाळ वृत्तसेवा | Tuesday, 17 November 2020

काटेपूर्णा प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी सोडण्यास सुरुवात झाली. मात्र या प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कालव्यांची दुरुस्तीच झाली नाही. झाडझुडपांनी पाण्याचा प्रवाह जागोजागी अडविला आहे.

अकोला  ः काटेपूर्णा प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी सोडण्यास सुरुवात झाली. मात्र या प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कालव्यांची दुरुस्तीच झाली नाही. झाडझुडपांनी पाण्याचा प्रवाह जागोजागी अडविला आहे.

त्यामुळे रब्बीत सिंचनासाठी पाणी सोडूनही शेतकऱ्यांपुढे सिंचनाचा प्रश्न कायमच आहे. पाटबंधारे विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकऱ्यांवर मात्र अतिरिक्त आर्थिक भुर्दंड पडणार आहे.

काटेपूर्णा प्रकल्पांतर्गत कालव्यांची संपूर्ण दुरुस्तीच करण्यात आली नाही. त्यानंतरही रविवारपासून रब्बी हंगामासाठी पाणी साेडण्यास सुरुवात झाली. मात्र झाडाझुडपांनी वेढलेल्या कालव्यातून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचणार कसे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे सिंचनासाठी शेतकऱ्यांवरच अतिरिक्त ताण येणार असून, सिंचनासाठी आर्थिक भुर्दंडासह अधिक मजूरही लावावे लागणार असल्याचे मत सिंचन तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

दुरुस्तीसाठी हवेत दोन कोटी!
काटेपूर्णा प्रकल्पांतर्गत दुरुस्तीसाठी ३७ लाख रुपये पाटबंधारे विभागाला मिळाले होते. त्यामुळे संपूर्ण दुरुस्ती करता आली नसल्याचा दावा पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी केला आहे. त्यातच आता २ काेटींची मागणी करण्यात आली आहे. हा निधी कालवा दुरुस्तीसह अन्य कामांचे नियाेजन करून वेळेत शासनाकडे मागणी नोंदविली असती तर रब्बीच्या सिंचनाला पाणी सोडण्यापूर्वी कामे करता आली असती. मात्र ना अधिकाऱ्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला ना पालकमंत्री बच्चू कडू यांनी त्यांच्या विभागाचे काम असूनही त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आजची परिस्थिती ओढवली आहे.

दुरुस्ती नाही म्हणून पाणी सोडलेच नसते का?
काटेपूर्णा प्रकल्पातून सिंचनासाठी कालव्यात पाणी सोडण्यापूर्वी कालव्यांची दुरुस्ती करणे आवश्यक असते. या कालव्यांची दुरुस्ती करण्याची प्रतीक्षा पाटबंधारे विभागाचे अभियंता करीत होते. मात्र रब्बीच्या सिंचनाची वेळ निघून जात असतानाही कालवा दुरुस्तीसाठीच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला नसल्याची माहिती आहे.

त्यामुळे भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी कालवा दुरुस्ती नाही म्हणून शेतकऱ्यांना पाणी सोडणार नाही का असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी रविवारपासून पाणी सोडण्यास सुरुवात केली. मात्र आता सिंचनासाठी शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)