ह्रदयद्रावक! चारित्र्यावर संशय; पोटात चार महिन्याचे बाळ असतानाही विवाहितेने गळफास लावून केली आत्महत्या

सकाळ वृत्तसेेवा | Friday, 20 November 2020

सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

बाळापूर (जि.अकोला) ः सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

मात्र ही आत्महत्या नसून हा घातपात असल्याचा आरोप माहेर कडील मंडळींनी केला असून पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे. दरम्यान पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुरुवारी (ता. १९) तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत पतीसह तीन जणांना ताब्यात घेतले आहे. पूनम सुबोध तायडे असे चार महिन्यांच्या गर्भवती आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील भारत वाकोडे यांची मुलगी पूनम हिचा विवाह बाळापूर तालुक्यातील निंबा येथील सुरेश तायडे यांच्या सुबोध या मुलाशी नऊ महिन्यांपूर्वी झाला होता. लग्नानंतरचा काही काळ लोटल्यानंतर सासरच्या मंडळींनी तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण करण्यात सुरुवात केली.

दररोज या ना त्या कारणावरून तिचा मानसिक छळ करण्यात येत होता. असा आरोप पूनमच्या माहेरवाशीयांनी केला आहे. दरम्यानच्या काळात काही दिवस ती माहेरी देखील राहिली. वारंवार सासरी होणारा त्रास सहन न झाल्याने काल बुधवारी (ता. १८) आपल्या राहत्या घरी निंबा येथे ओढणीचा फास तयार करुन या एकोणीस वर्षीय लेकीने आपली जीवनयात्रा संपविली.

सासरच्यांनीच मारल्याचा आरोप
नवविवाहितेने बुधवारी दुपारच्या सुमारास आत्महत्या केली. त्यानंतर फासावरुन मृतदेह उतरवून सासरच्या मंडळींनी सदर मृतदेह सर्वोपचार रुग्णालयात नेला. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. आपल्यावर घातपाताचा संशय येऊ नये म्हणून घटनास्थळी पोलिस दाखल होण्यापूर्वीच मृतदेह रुग्णालयात नेला असून सासरच्या मंडळींनीच तीचा जीव घेतला असा आरोप मयत पूनमच्या नातेवाईकांनी केला आहे.

मृतदेह पोलिस ठाण्यात नेण्याचा होता बेत
पूनमच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या तिच्या सासरच्या मंडळींना तात्काळ अटक करा, अन्यथा मृतदेह उरळ पोलिस ठाण्यात नेण्याचा पवित्रा मयत पूनमच्या नातेवाईकांनी घेतला होता. मात्र उरळ ठाणेदार अनंत वडतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी विजय चव्हाण यांनी आज गुरुवारी दुपारच्या सुमारास मयत पूनमचा पती सुबोध तायडे, सुरेश सखाराम तायडे व सासू सूर्यकांता तायडे यांना सर्वोपचार मधून ताब्यात घेतले.

दोन्ही जीव निघून गेले....!
पूनमने आत्महत्या केली खरी, मात्र ती एकटी या जगातून गेली नसून तिच्या गर्भात चार महिन्यांपासून फुलणाऱ्या कळीला सुद्धा ती सोबत घेवून गेली. तिला सर्वोपचारमध्ये आणल्यानंतर तिच्या उदरात काही हालचाली जाणवल्या मात्र हळूहळू ही हालचाल मंद होत गेली, अशी माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली आहे. दोन्ही जीव निघून गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)