esakal | राज्यभरातील एक लाख वारकरी पोहचणार अकोल्यात, सरकारला सद्‍बुद्धी मिळावी यासाठी वारकऱ्यांनी केला यज्ञ 
sakal

बोलून बातमी शोधा

 Akola News: One lakh Warakaris from Maharashtra will reach Akola, Warakaris perform Yajna to give wisdom to the government

वारकऱ्यांना धार्मिक कार्य करण्याची परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी गणेश महाराज शेटे यांच्या वतीने नियमित तर इतर वारकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गत सात दिवसांपासून साखळी पद्धतीने आमरण उपोषण करण्यात येत आहे.

राज्यभरातील एक लाख वारकरी पोहचणार अकोल्यात, सरकारला सद्‍बुद्धी मिळावी यासाठी वारकऱ्यांनी केला यज्ञ 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः वारकऱ्यांना धार्मिक कार्य करण्याची परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी गणेश महाराज शेटे यांच्या वतीने नियमित तर इतर वारकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गत सात दिवसांपासून साखळी पद्धतीने आमरण उपोषण करण्यात येत आहे.

परंतु सरकार वारकऱ्यांच्या मागणीची दखल घेत नसल्याने सरकारला सद्‍बुद्धी मिळावी यासाठी वारकऱ्यांनी सोमवारी (ता. ७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सद्‍बुद्धी यज्ञ केला. आंदोलनाची दखल सरकार घेत नसल्याने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी वारकऱ्यांनी दिला.


वारकऱ्यांना भजन, कीर्तन करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी विश्व वारकरी सेना व इतर वारकरी संघटनांनी सरकारकडे केली आहे. परंतु सदर मागणीची दखल घेण्यात आली नसल्याने गत सात दिवसांपासून गणेश महाराज शेटे सतत उपोषण करत आहेत.

त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. दरम्यान या विषयी वारकऱ्यांच्या एक शिष्टमंडळाने सोमवारी (ता. ७) जिल्हाधिकारी यांची भेट घेतली व तत्काळ धार्मिक कार्यक्रमाला १०० लोकांची उपस्थितीची परवानगी देणारे पत्र जारी करण्याची मागणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी हा मुद्दा राज्यस्तरीय असल्याने वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री यांच्याशी संपर्क करून निर्णय देतो, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर दुसऱ्या फेरीच्या चर्चेदरम्यान जिल्हाधिकारी यांनी धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नसल्याचे सांगितले.

त्यामुळे उपोषणकर्ते आणि वारकऱ्यांचे समाधान न झाल्याने उपोषण अखंडितपणे चालू ठेवण्याचा निर्णय वारकऱ्यांनी घेतला. दरम्यान सरकारला भगवंत सद्बुद्धी देवो, याकरिता वारकऱ्यांच्या वतीने सद्‍बुद्धी यज्ञ करण्यात आला.

यज्ञाचे पौरोहित्य जावरकर महाराज यांनी केले. यावेळी हभप गजानन महाराज दहिकर यांची कीर्तन सेवा पार पडली. यावेळी हभप गुरुवर्य गोपाळ महाराज उरळकर यांची उपस्थिती लाभली.


मान्यवरांनी दिल्या भेटी
वारकऱ्यांच्या उपोषण मंडपाला सोमवारी (ता. ७) अरुण महाराज लांडे, प्रवीण महाराज कुलट, शिवा महाराज बावस्कर, महेश महाराज मारवाडी, सुभाष महाराज काळे, केशव महाराज मोरे, रतन महाराज वसु, कोंडीराम महाराज नागरगोजे, पुरुषोत्तम महाराज नेमाडे, गोपाल महाराज नारे, मनोहर महाराज डुकरे, राज महाराज भाकरे, जितेंद्र महाराज निंबोकार, तुषार महाराज पाटील आदि संतमंडळींनी प्रवचन सेवा दिली.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image
go to top