esakal | ऑनलाइन परीक्षांचे परिणाम; पदव्युत्तर प्रवेशासाठी गुणवत्ता डावलण्याची भिती
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Online exam results; Fear of quality degradation for postgraduate admission

 कोरोना विषाणू कोविड-१९ च्या संसर्गानंतर करण्यात आलेल्या लॉकडाउननंतरचे परिणाम शैक्षिणक क्षेत्रात आता प्रकर्षाने जाणवू लागले आहेत. पदवी परीक्षा ऑनलाइन झाल्यामुळे विद्यापीठाचे निकाल जवळपास १०० टक्के लागले आहेत.

ऑनलाइन परीक्षांचे परिणाम; पदव्युत्तर प्रवेशासाठी गुणवत्ता डावलण्याची भिती

sakal_logo
By
मनोज भिवगडे

अकोला : कोरोना विषाणू कोविड-१९ च्या संसर्गानंतर करण्यात आलेल्या लॉकडाउननंतरचे परिणाम शैक्षिणक क्षेत्रात आता प्रकर्षाने जाणवू लागले आहेत. पदवी परीक्षा ऑनलाइन झाल्यामुळे विद्यापीठाचे निकाल जवळपास १०० टक्के लागले आहेत.

त्यामुळे आता पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी असलेल्या मर्यादित जागांवर विशेषतः एमएससी प्रवेश घेताना गुणांच्या आधारे स्पर्धा होऊन गुणवत्ता डावलल्या जाण्याची भिती व्यक्त होत आहे. याचा विद्यापीठ स्तरावर कुठेही विचार झालेला दिसत नाही.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत येणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर प्रवेश सुरू झाले आहेत. पदवी परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणांच्या आधारावर प्रवेश दिला जात आहे. मुळातच वरिष्ठ महाविद्यालयांची संख्या व त्यातही नामांकित महाविद्यलयांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या अधिक असते.

त्यात यावर्षी कोविड-१९ संसर्गामुळे विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमांच्या पाचव्या व सहाव्या सेमिस्टरच्या परीक्षा ऑनलाइन घेतल्यात. तर पाचव्या सेमिस्टरमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा महाविद्यालयीन स्तरावर असाईन्मेंटच्या आधारावर घेण्यात आल्यात. त्यामुळे साहजिकच नियमित परीक्षा देणाऱ्या इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत महाविद्यलयीन स्तरावर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणसंख्येला फुगवटा अधिक असल्याचे बघावयास मिळत आहे.

मात्र जे विद्यार्थी पाचव्या सेमिस्टरमध्ये नियमित परीक्षा देत उत्तीर्ण होऊन सहाव्या सेमिंटरची परीक्षा ऑनलाइन देत उत्तीर्ण झाले त्यांना सरासरी गुणसंख्येच्या आधारावर एमएससी प्रवेशापासून वंचित रहावे लागण्याची भिती व्यक्त होत आहे.

विद्यापीठ स्तरावर विचारच नाही
अनुत्तीर्ण व नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील फरक लक्षात घेवून त्यांच्या गुणांची तुलना करून प्रवेश देताना येणाऱ्या अडचणी व त्यामुळे गुणवत्ता डावल्या जाण्याची शक्यता बघता विद्यापीठ स्तरावर या सर्व बाजूने विचार होणे अपेक्षित होते. मात्र परीक्षा उरकण्यातच रस असलेल्या विद्यापीठाच्या ॲकेडेमिक कौंशिलमध्ये ऑनलाइन परीक्षेनंतर पुढच्या वर्गात प्रवेश घेताना येणाऱ्या अडचणीबाबत विचारच झाला नाही.


प्रवेश परीक्षेतून मिळाला असता न्याय
परीक्षेच्या गोंधळात गुणांच्या संख्येला आलेला फुगवटा व त्यामुळे पदव्युत्तर प्रवेशात गुणवत्ता असलेले विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने मोठा पेच निर्माण होऊ शकतो. त्यावर तोडगा काढण्यासाठी विद्यापीठ स्तरावर प्रवेश परीक्षा घेवून पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात आले तर गुणांच्या फुगवट्यात गुणवत्ता असलेले विद्यार्थी मागे पडण्याची शक्यता कमी आहे.

राज्यातील इतर विद्यापीठात प्रवेश परीक्षा
राज्यातील काही प्रमुख विद्यापीठात विशेषतः पुणे विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमाला गुणवत्ता असलेले विद्यार्थीच प्रवेश मिळवू शकतात. हीच पद्धत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातही अवलंबिता आली असती.


विज्ञान शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा मुळातच कमी आहेत. त्यात यावर्षी परीक्षांचा झालेला गोंधळ, नापास विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन स्तरावर उत्तीर्ण करण्यात आल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा आयोजित केल्यास गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना न्याय देता येईल.
- प्रा. डॉ. संजय खडक्कार, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य, नागपूर विद्यापीठ

(संपादन - विवेक मेतकर)

loading image