लाॅकडाउन काळात सापडला सेंद्रिय शेतीचा मार्ग, समाजमाध्यचा भाजीपाला विक्रीसाठी वापर; दीड एकरावर १२ जणांच्या कुटुंबाची गुजरान

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 22 December 2020

कोरोना महामारी व त्यानंतर लागलेल्या लाॅकडाउनने अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. मात्र, वाशीम तालुक्यातील बिटोडा तेली या छोट्याशा गावातील सदाशिव राऊत या अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांने कल्पकतेने सेंद्रिय शेतीचा आधार घेत विषमुक्त भाजीपाला उत्पादनात नाव कमावले आहे.

वाशीम : कोरोना महामारी व त्यानंतर लागलेल्या लाॅकडाउनने अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. मात्र, वाशीम तालुक्यातील बिटोडा तेली या छोट्याशा गावातील सदाशिव राऊत या अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांने कल्पकतेने सेंद्रिय शेतीचा आधार घेत विषमुक्त भाजीपाला उत्पादनात नाव कमावले आहे. समाज माध्यमांच्या उपयोगितेतून घरपोच सेंद्रिय भाजीपाला विक्रीने १२ जणांच्या कुटुंबाचा डोलारा लाॅकडाउनमध्येही पेलला आहे.

बिटोडा तेली या गावातील अशोक राऊत यांचा परंपरागत भाजीपाला उत्पादन करण्याचा व्यवसाय होता. बाजारात मिळणारे बियाणे खते व किटकनाशकाचा वापर करत त्यांचे उत्पादन सुरू होते. मात्र यामध्ये बहुतेक वेळेस नुकसानच हातात पडायचे. त्यात कोरोनाने कहर केल्याने उत्पादित केलेला भाजीपाला घेण्यासही कोणी तयार नव्हते.

लाॅकडाउनने घराच्या बाहेर पडता येत नव्हते. त्यामुळे १२ जणांच्या कुटुंबाचे काय, असा प्रश्न निर्माण झाला.

Image may contain: plant and food

मात्र अशोक राऊत यांचा मोठा मुलगा सदाशिव राऊत याने सेंद्रिय पध्दतीने भाजीपाला उत्पादित करण्याचा निर्णय घेतला. बाजारपेठेची अडचण आल्याने सदाशिव राऊत यांनी समाजमाध्यमांवर याची माहिती देणे सुरू केले.

सुरुवातीला अल्प प्रतिसाद मिळाला मात्र, भाज्यांची चव, गुणवत्ता पाहून ग्राहक वाढत गेले. सध्या दररोज पाच ते सहा क्विंटलवर भाजीपाला घरपोच विक्री केला जातो.

Image may contain: plant, flower, food and nature

गो-धनाची उपयुक्तता
सदाशिव राऊत यांच्याकडे दहा देशी गाई आहेत. त्यांचे शेण व मूत्र वापरून जिवामृत तयार केले जाते. शेणखत, जिवामृत व लिंबोळीचा वापर करून भाजीपाला पिकवला जातो.

विदेशी भाज्यांचाही प्रयोग
सदाशिव राऊत यांनी सेंद्रिय देशी भाजीपाल्यासोबत विदेशी भाजीपाला पिकविण्याचा प्रयोग केला आहे. एरव्ही विदेशी भाजीपाला हा पाॅलिहाऊस शिवाय पिकवता येत नाही हा समज आहे. मात्र, सदाशिव राऊत यांनी सेंद्रिय पध्दतीने उघड्या शेतात विदेशी भाजीपाला पिकविला आहे. या भाजीपाल्याला कोणतेही रासायनिक खत किंवा किटकनाशक न दिल्याने हा भाजीपाला उत्पादन देतो, अशी प्रतिक्रीया सदाशिव राऊत यांनी दिली.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Organic farming route found during lockdown