भ्रष्ट ग्रामसेवकांना मिळतेय पंचायत विभागाचे पाठबळ!

Akola News: Panchayat Department supports corrupt Gram Sevaks!
Akola News: Panchayat Department supports corrupt Gram Sevaks!

अकोला  ः ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद प्रशासन यातील प्रमुख दुवा असलेले ग्रामसेवक पद खऱ्या अर्थाने गावपातळीवर समस्यांना न्याय देणारे आहे. मात्र जिल्ह्यात काही भ्रष्ट ग्रामसेवकांच्या माध्यमातून गावाचा बट्याबोळ होत असल्याचा आरोप करत स्थायी समितीचे सदस्य गजानन पुंडकर व चंद्रशेखर चिंचोळकर यांनी अशा कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करत पंचायत विभागाला आजच्या सभेत चांगलेच धारेवर धरले शिवाय खाते चौकशीची मागणी लावून धरली.


जिल्हा परिषदेच्या ३० सप्टेंबर रोजी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर यांनी पातूर तालुक्यातील आलेगाव येथील ग्रामसेवक सोळंके यांनी ग्रामपंचायत कार्यालयाचे दप्तर हरविले असून, काही कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीत अपहार केल्याचा आरोप करत यांच्या मनमानी आणि कामचुकार पणाचा पाढा वाचला होता. यावर पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजीव फडके यांनी बीडीयो मार्फत अहवाल मागवून कारवाईचे आश्वासन दिले होते.

मात्र महिन्यानंतरही संबधित सदस्यांना याबाबत लेखी अनुपालन न मिळल्याने विरोधक व सत्ताधारीही आज पंचायत विभागावर तुटून पडले होते. अशा कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली.

विषय सूचिवरील तिन्हीही विषय मंजूर करत जिल्हा परिषदेच्या रिक्त जागा भरण्याबाबत बाबत ठरावही घेण्यात आला. यावर बीडीयोकडून आलेल्या अहवालावरून करावाई करू असे डेप्युटी सीईओनी आश्वासन दिले.

आजची ऑनलाईन सभा जि.प अध्यक्ष प्रतिभा भोजने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली तर सभेचे सचिव म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजीव फडके यांनी काम पाहले. सभेला सत्ताधारी गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, आकाश शिरसाट, मनीषा बोर्डे, पंजाबराव वडाळ, सदस्य गोपाल दातकर, गजानन पुंडकर, चंद्रशेखर चिंचोळकर, डॉ प्रशांत अढाऊ, सुनील फाटकर यावेळी उपस्थित होते.


तेल्हारा पं.स बीईओंवर शिस्तभंगाची मागणी
तालुक्यातील सीरसोली जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी येथील बीईओ यांनी परस्पर खासगी शिक्षण संस्थेला वळते केले. जि.प शाळांची पटसंख्या वाढविण्याचे काम या अधिकाऱ्यांचे आहे. मात्र पगार शासनाचा घ्यायचा व मदत खासगी संस्थेला करायची असा गंभीर आरोप जि.प सदस्य डॉ. प्रशांत अढाऊ यांनी करत संबधित बीईओवर शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी लावून धरली. यावर शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग यांनी विद्यार्थ्यांच्या टीसी पालकांच्या विनंतीनुसारच देण्यात आल्या असे स्पष्ट केले. शिवाय चौकशीअंती कारवाईचे आश्वासनही दिले.


अनुदानित बियाणे धनादेशाच्या जाचक अटी रद्द करा
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून अनुदानावर बियाणे वाटप करण्यात येते. यावर्षी साडेआठ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ झाला. त्यांचे धनादेश वाटप कालपरवाच सुरू झाले; मात्र लाभार्थ्यांना कृषी विभागाच्या जाचक अटींमुळे मनस्ताप होत असल्याचे सदस्य गोपाल दातकर यांनी निदर्शनास आणून दिले. शिवाय जास्त कागदपत्रांची मागणी न करता एकच स्वयंघोषणा पत्र द्या, अशी मागणी केली. याला जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ मुरली इंगळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अंमलबजावणीचे आश्वासन दिले.


या विषयांना मिळाली मंजुरी!
-३० सप्टेंबर रोजी पार पडलेल्या मागील स्थायी समितीच्या सभेचे इतिवृत्त वाचून कायम
- आबासाहेब खेडकर सभागृहाची माहे मार्च २०२० ते जून २०२० पर्यंत आरक्षित करण्यात आलेली अर्जदारांचे अनामत रक्कम परत करणे बाबत.
- ग्रामपंचायत वडाळी सटवाई ता. अकोट येथील महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४२ अन्वये औद्योगिक प्रयोजनासाठी परवानगी मिळणेबाबत.
- जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असणाऱ्या सर्व विभागातील रिक्त जागेचा अहवाल शासनाला पाठवणेबाबत.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com