पाचशे रुपये द्या अन्यथा बाळ देणार नाही, प्रसुती झालेल्या महिलेची रुग्णालयाकडूनच अडवणूक

सकाळ वृत्तसेवा | Thursday, 24 December 2020

चिखली उपजिल्हा रुग्णालयामध्ये काही नर्सेस प्रसूती साठी आलेल्या महिलांच्या नातेवाईकांकडून पैसे घेतल्याशिवाय प्रसूती करीत नसल्याच्या अनेक तक्रारी आलेल्या आहेत . परंतु रविवारी (ता. 20) प्रसूतीसाठी पैसे न दिल्यामुळे चक्क बाळच मिळणार नसल्याची धमकी देणार्‍या नर्सच्या विरोधात पैसे घेतल्याची तक्रारीचा एका महिलेने हिम्मत करून  व्हिडियो व्हायरल केल्याने एकच खळबळ उडाली.

चिखली (जि.बुलडाणा) : चिखली उपजिल्हा रुग्णालयामध्ये काही नर्सेस प्रसूती साठी आलेल्या महिलांच्या नातेवाईकांकडून पैसे घेतल्याशिवाय प्रसूती करीत नसल्याच्या अनेक तक्रारी आलेल्या आहेत . परंतु रविवारी (ता. 20) प्रसूतीसाठी पैसे न दिल्यामुळे चक्क बाळच मिळणार नसल्याची धमकी देणार्‍या नर्सच्या विरोधात पैसे घेतल्याची तक्रारीचा एका महिलेने हिम्मत करून  व्हिडियो व्हायरल केल्याने एकच खळबळ उडाली.

सरकारी रुग्णालयात होणाऱ्या दुर्लक्षामुळे रुग्णांना अनेकवेळा मरणयातना सोसाव्या लागतात. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील ग्रामीण रुग्णालयातही असाच संतापजनक प्रकार सलग दोन रात्रीत घडला आहे.

हेही वाचा - शेतकऱ्यांच्या विश्वासाचं बियाणं करतंय दरवर्षी सहाशे कोटींची उलाढाल, महाबीजचा असा चालतो कारभार

Advertising
Advertising

कामचुकारपणाचा कळस आणि पैशाच्या लालसेपायी प्रसुतीपश्चात केवळ पाचशे रुपयांसाठी नवजात बाळ मातेच्या स्वाधीन करण्यास अडवणूक केल्याची घटना 19 डिसेंबरच्या रात्री घडली. तर 21 डिसेंबरच्या रात्री प्रसव वेदनेने विव्हळणाऱ्या महिलेकडे साफ दुर्लक्ष करण्यात आलं. नाईलाजाने गरोदर महिलेची प्रसुती तिच्या आईला करावी लागली. या स्थितीतही सुमारे हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पार्वती सुरडकर या महिलेने आपल्या गरोदर मुलीला 19 डिसेंबरच्या रात्री नऊच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान रात्री दोनच्या सुमारास प्रसुती वेदना सुरु झाल्याने रुग्णालयात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांनी प्रसुतीसाठी 1200 रुपयांची मागणी केली. मुलीचा त्रास पाहता पार्वतीबाईंनी ती मागणी मान्य केली. मात्र, प्रसुतीपश्चात त्यांच्याकडे दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली. मोलमजुरीने उदरनिर्वाह करणाऱ्या पार्वतीबाईकडे त्यावेळी दीड हजार रुपयेच होते. त्यात रात्रीची वेळ पैसे आणायचे कुठून असा प्रश्न त्या महिलेला पडला होता. मात्र, लालसेची परिसीमा गाठलेल्या संबंधित महिला कर्मचाऱ्यांनी उर्वरित पाचशे रुपये द्या तेव्हाच बाळ दिलं जाईल, असं सांगत अडवणूक करण्यात आली. याबाबत पार्वतीबाईंनी लेखी तक्रार देखील केली आहे.

हेही वाचा -  एका तासात नववधूचा केला ऑनलाईन मेकअप

दुसऱ्या प्रकरणात सवणा येथील शेख समीर शेख सत्तार यांनी 21 डिसेंबरच्या रात्री आपल्या बहिणीला प्रसुतीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. या महिलेला दहाच्या सुमारास प्रसुतीवेदना सुरु झाल्याने महिलेच्या कुटुंबियांनी रुग्णालयात कार्यरत परिचारकांना याबाबत माहिती देऊन रुग्णाला पाहण्याची विनंती केली. मात्र, संबंधित महिला कर्मचाऱ्यांनी सकाळी प्रसुती होईल असे सांगून रुग्णाकडे पाहण्याची तसदी घेतली नाही.

दरम्यान गरोदर महिलेला त्रास वाढल्यानंतर पुन्हा माहिती दिली असता बुलडाणा येथे पाठवण्याची धमकी दिली. तिसऱ्यांदा विनंती केल्यानंतरही महिला कर्मचाऱ्यांनी रुग्णाकडे पाहण्याचे टाळले. नाईलाजाने महिलेच्या तीव्र प्रसुती वेदना पाहता तिच्या आईनेच स्वत: तिची प्रसुती सुकर केली. रुग्णालयात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांनी प्रसुतीसारख्या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष तर केलेच शिवाय कुटुंबियाकडून 500 रुपयेही घेतले. याखेरीज साफसफाई करणाऱ्या महिलेने 200 तर रक्त-लघवी तपासणीसाठी वेगळे 300 रुपये घेतल्याचा आरोप शेख समीर यांनी लेखी तक्रारीद्वारे केला आहे.

हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणुकीचे नामांकन अर्जाचा डोक्याला ताप
नवीन बॅंक खाते मागितल्याने वाढली डोकेदुखी

केवळ पाचशे रुपयांसाठी बाळ देण्यास टाळल्याची तक्रार करणाऱ्या पार्वतीबाई सुरडकर यांच्या तक्रारीचा व्हिडीओ मोबाईलवर चित्रीत करण्यात आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही माहिती मिळताच आमदार श्वेताताई महाले यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना तातडीने व्हायरल झालेला व्हीडीओ आणि पत्र देऊन प्रकरणाची चौकशी करून दोषींवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर आज चिखलीमध्ये चौकशी समिती दाखल झाल्याने त्यांनी चौकशी समितीची भेट घेऊन दोषींना तातडीने निलंबित करण्याची मागणी केली.

चौकशीनुसार जिल्हा शल्य चिकित्सक यांनी ग्रामीण रुग्णालय, चिखली येथील अधिपरिचारिका यांनी रुग्णांकडून पैसे घेतल्याबाबत केलेल्या चौकशीचा अहवाल त्यांच्याकडून सहसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई यांच्याकडे पुढील कार्यवाहीस्तव पाठविला असून जिल्हाधिकारी, बुलडाणा यांना माहितीस्तव प्रत अग्रेषित केलेली आहे.  

(संपादन - विवेक मेतकर)