
जीवनभर सतत नाटक आणि नाटक हाच ध्यास घेतलेला कलावंत राममाम जाधव गेल्याने अकोल्याच्याच नव्हे तर विदर्भाच्या नाट्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. अकोल्यात सुसज्ज नाट्यगृह असावे हे मामांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
अकोला : जीवनभर सतत नाटक आणि नाटक हाच ध्यास घेतलेला कलावंत राममाम जाधव गेल्याने अकोल्याच्याच नव्हे तर विदर्भाच्या नाट्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. अकोल्यात सुसज्ज नाट्यगृह असावे हे मामांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
त्याचा परिपाक म्हणून अकोला येथे मराठा नगरात सुसज्य नाट्यगृहाची इमारत उभी झाली. मात्र जिल्ह्यातील नियोजशून्य राजकीय कारभारामुळे राममामांचे स्वप्न त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकले नाही. अपूर्ण राहिलेल्या नाट्यगृहाचे काम पूर्ण करून सुसज्य नाट्यगृहाचे लोकापर्ण झाले तर तीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरणार आहे, अशा भावना अकोल्यातील सांस्कृतिक क्षेत्रात उमटत आहे.
थोडे थोडके नव्हे तब्बल ५० वर्षे राममामा जाधव हे नाव, राज्य नाट्यस्पर्धांमध्ये सातत्याने गाजत राहिलं. नाट्यशास्त्राचं चालतं बोलतं विद्यापीठच. १९७१ ते ७७ म्हणजे नोकरी निमित्त नाशिकला प्रस्थान करेपर्यंत राज्य नाट्यस्पर्धेची ७-८ नाटकं तर ५-६ गणेशोत्सवाची नाटकं मामाच्या मार्गदर्शनात केली. मामांनी आपलं अख्ख आयुष्य हौशी रंगभूमीला समर्पित केलं. आजचा दिवस फार वेदनादायी ठरला , माझ्या नाट्यगुरूंचं माझ्यावरचं छत्र आज अखेर कायमचं हरपलं.
-प्रा. मधू जाधव, ज्येष्ठ नाट्यकर्मी
अकोला ज्येष्ठ रंगकर्मी राममामा जाधव यांच्या दुःखद निधन मुळे नाट्यक्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत व कला क्षेत्राची फार मोठी हानी झाली.
-संजय धोत्रे, केंद्रीय राज्यमंत्री
सतत मार्गदर्शन करून चांगल्या बाबीसाठी पाठपुरावा करणारे पितातूल्य व्यक्तिमत्व राम जाधव यांनी अकोल्यात सांस्कृतिक भवन यासाठी पाठपुरावा केला. त्यांची मागणी आम्ही केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे यांच्या व आपले सहकारी सावरकर यांच्या सहकार्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली त्यांनी तातडीने मंजूर केली सांस्कृतिक भवनात टक्केपेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. परंतु आघाडी सरकारने निधी न दिल्यामुळे त्यांचा स्वप्न पूर्ण झाला नाही याची खंत आपल्याला असून ते पूर्ण करण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहू.
- गोवर्धन शर्मा, आमदार
कलाक्षेत्रातील सुप्तगुणांना वाव देऊन नवीन कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं काम राम जाधव यांनी केलं. ९१ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवून अकोल्याचे नाव रोशन केले. मामा म्हणून प्रसिद्ध जाधव यांच्या निधनाने कलाक्षेत्रातील मार्गदर्शक निघून गेल्यामुळे फार मोठी हानी झाली.
- रणधीर सावरकर, आमदार
(संपादन - विवेक मेतकर)