esakal | परतीच्या पावसाने सगळं संपवलंं; सर्वत्र नुकसान; सोयाबीन कापूस मातीमोल 
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: The return rain ended everything; Damage everywhere; Soybean Cotton Soil

 यावर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर तब्बल दीड महिना उशिराने जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मधल्या काळात खंड दिल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मात्र पावसाने कमी दिवसांत सरासरी भरुन काढली.

परतीच्या पावसाने सगळं संपवलंं; सर्वत्र नुकसान; सोयाबीन कापूस मातीमोल 

sakal_logo
By
सुगत खाडे

अकोला : यावर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर तब्बल दीड महिना उशिराने जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मधल्या काळात खंड दिल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मात्र पावसाने कमी दिवसांत सरासरी भरुन काढली.

दरम्यान आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची कापणी करुन ठेवली आहे. परंतु रविवारी (ता. ११) दुपारनंतर जिल्ह्यात सर्वत्र अचानक पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांनी शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन हातचे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासह पांढरे सोने सुद्धा पावसात ओले झाल्याने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली आहे.


कोरोना महामारीच्या संकटातून संपूर्ण देश भीतीयुक्त वातावरणात जगत असताना कष्टकरी शेतकरी कोरोनाची भीती न ठेवता देशाला धनधान्याने समृद्ध करण्याकरिता रात्रीचा दिवस करीत राबराब राबत आहे. अशातच सोयाबीन, कापूस घरी येण्याचा स्थितीत असताना रविवारी (ता. ११) सकाळपासूनच जिल्ह्यात काळे ढगांनी मुक्काम ठोकला होता. दुपारनंतर अचानक ढगातून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली.

या पावसाने शेतातील सोयाबीनच्या गंज्या व कापून पडलेले सोयाबीन ओले झाल्याने सोयाबीन पिकाची नासाडी होत पीक मातीमोल झाले आहे. ग्रामीण भागातील काही ठिकाणी दुपारपासून सायंकाळपर्यंत पावसाची सतत एकसारखी धार सुरू असल्याने शेतात जिकडे तिकडे पाणीच पाणी साचल्याने शेतात तलावसदृश्य स्थिती पहायला मिळाली. यापूर्वीच झालेल्या अतिवृष्टीने कपाशीचे हिरवी बोंडे काळे पडले होते. त्यातच आता परतीच्या पावसाने कपाशी व सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोरिल संकटाची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत आहे.


सोयाबीनला सर्वाधिक फटका
परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. सोयाबीनची सोंगणी, काढणी सुरू असताना परतीचा पावसाने रविवारी जोरदार हजेरी लावली. त्यामुळे काही शेतकऱ्यांचे शेतात सोयाबीन सोंगूण पडले आहे तर, काही शेतकरी सोंगणी, मळणी करीत आहेत. त्यांनाही पावसाचा फटका बसला आहे. कपाशीला सुद्धा बोंडी धरली आहेत. पात्या आल्या आहेत. परंतु परतीच्या पावसामुळे कपाशीचे सुद्धा नुकसान झाले आहे. फळबागांचेही नुकसान आहे. पावसाचे पाणी शेतात साचल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने पळवला आहे.


मेघगर्जनेसह पावसाचा कहर; पिकांचे नुकसान
वणी वारुळा ः अकोट तालुक्यातील वणी वारुळा परिसरात रविवारी (ता. ११) दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे परिसरातील शेतीतील सोयाबीन, ज्वारी व कापशीचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मूग, उडीद सारखे पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेल्यानंतर शेतकरी सोयाबीनचा आधार मिळेल अशी अपेक्षा करत होते. परंतु सोयाबीन काढल्यानंतरच परिसरात पावसाने कहर घातल्याने या पावसामुळे शेतीतील हाती येणारे पिके म्हणजे सोयाबीन, ज्वारी, कपाशी हे पूर्णतः ओले चिंब झाले. पावसामुळे ज्वारी ही काळी झाली आहे. कपाशीचे रोप पावसामुळे जमिनीवर पडून खराब झाले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहेत.

पाऊस उठला जीवावर, आईसह 3 मुले गंभीर जखमी, दोन शेतकरी भाजले तर वाशीममध्ये दोन वीज पडून  ठार

(संपादन - विवेक मेतकर)