esakal | मोहिदेपुरात वंचितांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य!
sakal

बोलून बातमी शोधा

 Akola News: Sanjay Khadses social commitment at Mohidepur

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामाेद तालुक्यातील माेहिदेपूर गावातील रहिवाशी बहुरुपी युवकांची नागपुरात भिक्षा मागत असताना गैरसमजूतीतून हत्या झाली हाेती.

मोहिदेपुरात वंचितांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकाेला   ः बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामाेद तालुक्यातील माेहिदेपूर गावातील रहिवाशी बहुरुपी युवकांची नागपुरात भिक्षा मागत असताना गैरसमजूतीतून हत्या झाली हाेती.

त्यावेळी जळगाव जामोद उपविभागाचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) प्रा. संजय खडसे यांनी पीडित कुटुंबातील महिलांना बहिण मानले होते व त्यांच्या सुखदुखात सहभाग होण्याचे आश्वासन दिले होते.

या आश्वासनाला न विसरता अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा साेमवारी (ता. १६) भाऊबीजच्या दिवशी दुपारी कुटुंबासह माेहिदेपुरात पाेहचले. मानलेल्या बहिणींकडून ओवाळून घेवून त्यांना साडीचाेळी लहान मुलांना कपडे, दिवाळीचे फराळ, खाऊ आणि रोख रक्कम देऊन भाऊबीज साजरी केली.

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामाेद तालुक्यातील माेहिदेपूर येथील काही युवक बहुरूपी वेशभूषा करून भिक्षा मागत असताना नागपूर येथे संशयित समजून त्यांना मारहाण करण्यात आली हाेती. या घटनेत ९ मे २०१२ रोजी सुपडा मगन नागनाथ, पंजाब भिका शिंदे, हसन दादाराव सोळंके यांचा मृत्यू झाला हाेता.

या घटनेमुळे या कुटुंबातील सदस्यांवर दुखःचा डोंगर कोसळला होता. त्या कुटुंबातील मुलं व इतराना आधार देणे आवश्यक होते. त्यामुळे सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी पदी कार्यरत असलेले प्रा. संजय खडसे हे त्यावेळी जळगाव जामोद येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.

त्यांनी पीडित कुटुंबातील विधवांना त्यांनी बहिण मानल्यामुळे सन् २०१२ पासून प्रा. खडसे त्यांच्यासाेबत भाऊबीज साजरी करतात व या कुटुंबाला भावनिक आधार देतात. या घटनेला आज आठ वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. तरीसुद्धा खडसे कुटुंब त्या गावात जावून भाऊबीज साजरी करते.

दरम्यान साेमवारी (ता. १६) सुद्धा उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या समवेत पत्नी नीता खडसे, भाऊ डॉ. सतीश खडसे, डॉ. सुनिता खडसे, कैलास गणेशपुरे यांच्यासह खडसे कुटुंबातील इतरांनी माेहिदेपूरात जावून पीडित महिलांसाेबत भाऊबीज साजरी केली.


युवकांना दिले शिक्षणाचे धडे
नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे प्रा. संजय खडसे मोहिदेपुरवासियांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याअंतर्गत त्यांनी गत दोन वर्षांपूर्वी पिडीत कुटुंबातील विधवा संगीता शेळके या महिलेला पिठाची गिरणी आणून दिली हाेती. दरम्यान यावर्षी प्रा. संजय खडसे व त्यांचे मोठे बंधू डॉ. सतीश खडसे यांनी गावातील युवकांसह विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व सांगितले. दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गावातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी, त्यासाठी हवे असेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी खडसे कुटुंबीयांनी युवक व विद्यार्थ्यांना दिले.

नागपुरातील हत्याकांडामुळे ज्या कुटुंबाचे छत्र हरवले, घरातील कर्ती माणसं गेली त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यामधून त्यांना सावरण्यासाठी, सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी जी थोडीफार मदत करतो त्यातून आनंद, समाधान मिळते. मोहिदेपुरातील युवक व विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व समजावे यासाठी त्यांना यावर्षी मार्गदर्शन केले. शिक्षणासाठी त्यांना नेहमीच सहकार्य करू, असे आश्वासन दिले.
- प्रा. संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला

(संपादन - विवेक मेतकर)