सुमारे एक लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा गोंधळ, अॅप ‘नॉट वर्कींग’, अधिकारी ‘नॉट रिचेबल’

विवेक मेतकर | Tuesday, 20 October 2020

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या १२ ऑक्टोबर पासून होणाऱ्या परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या, त्या आज २० ऑक्टोबर पासून सुरू होणार. मात्र, वेळेवर परीक्षा घेण्यात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अपयशी ठरले आहे.

अकोला: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या १२ ऑक्टोबर पासून होणाऱ्या परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या, त्या आज २० ऑक्टोबर पासून सुरू होणार. मात्र, वेळेवर परीक्षा घेण्यात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अपयशी ठरले आहे.

विविध विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना आज (ता.20) सकाळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेच्या अॅपवर लॉगीन करीत असताना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. परीक्षेच्या वेळेनंतरही जवळपास अर्धातास अॅपमध्ये विद्यार्थ्यांचे लॉगीन होत नव्हते. 

विद्यार्थ्यांना अडचणी असल्यास विद्यापीठ वेबसाईट वरील मुखपृष्ठावर न्यूज अॅन्ड अनाउन्समेंट मध्ये विद्यापीठातील अधिकारी व कर्मचायांची संपर्क यादी दिली असून विद्यार्थी आपल्या अडचणीचे निराकरण करुन घेण्याकरिता संपर्क यादी मधील कोणालाही फोन करु शकतात.

या आहेत अडचणी
विद्यापीठाची नियोजनशुन्यता, मॉक टेस्टचा अभाव, कुशल मनुष्यबळाचा अभाव, अपात्रताधारक सर्व्हिस प्रोव्हायडर, हेल्पलाइन केंद्राची अकार्यक्षमता व प्रशासकीय दिरंगाई,  यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. डिव्हाईस कनेक्‍टिव्हीटीचा अभाव आहे. ऑनलाइन पेपरचे लॉगइन होत नाही, लॉगइन झाले की पेपर येत नाही आणि पेपर आलाच, तर तो सबमिट होत नाही, असे एक ना अनेक समस्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे.

सर्व्हिस प्रोवायडरची अडचण
अनेक विद्यापीठात एकाच दिवशी एकाच वेळी अनेक शाखांचे पेपर घेतले जात असल्याने ऑनलाइन यंत्रणेवरचा ताण येऊन यंत्रणा निकामी ठरत आहे. विद्यार्थ्यांचे हेल्पलाइन नंबरवर आलेले फोनसुद्धा उचलले जात नसल्याचे पुढे येत आहे. एकाच दिवशी एकाच वेळी सर्व शाखांचे पेपर न घेता शाखानिहाय वेगवेगळ्या परीक्षा व्हायला हव्या होत्या. बहुतेक विद्यापीठात अपात्रताधारक सर्व्हिस प्रोवाईडरने मोठी अडचण निर्माण झाली आहे.

विद्यापीठाचे अधिकारी नॉट रिचेबल
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची परीक्षा देण्यासाठी तयार असलेल्या विद्यार्थ्यांना आज अनेक अडचणी भेडसावत होत्या. दरम्यान विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांशीही संपर्क केला. मात्र, विद्यापीठाचे अधिकाऱ्यांचा फोन लागत नसल्यामुळे अडचणींमध्ये आणखी वाढ झाली. 

अकार्यक्षम अॅफ, फटका विद्यार्थ्यांना
परीक्षा देण्याकरिता अॅप विकसित करण्यात आले असून त्याचे प्रात्याक्षिक यापूर्वीच परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी युट्यूबवरुन सादर केले होते. परीक्षेची रंगित तालिम घेतल्यानंतरीही विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरळीतपणे द्याव्या, त्यांना कुठलीही अडचण राहू नये, याचे विद्यापीठाकडून व्यवस्थित नियोजन न केल्याचे दिसून आले.

विद्यार्थ्यांना मानसिक त्रास
कोरोनाच्या महामारीकडे दुर्लक्ष करत राज्यभर विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू आहेत. मात्र, या परीक्षेत प्रचंड प्रमाणात गोंधळ उडाला असून, विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 

विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या अॅपमध्ये वारंवार लॉगीन करावे लागते. पहिलाच दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. मात्र, विद्यापीठाच्या वेबसाईटवर दिलेल्या वेगवेगळ्या क्रमांकावर संपर्क करून विद्यार्थ्यांनी आपल्या शंकांचे निरसन करावे, अशी माहिती विद्यापीठातून मिळाली आहे. 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकात तीन वेळा बदल करूनही ही विद्यापीठाने अकार्यक्षमतेचे प्रदर्शन केले आहे. 
परीक्षा ही सकाळी 10 वाजता होती परंतु 12 वाजेपर्यंत लॉग इन होत नाही आहे. त्यामध्ये अडचण येत असून विद्यार्थी गोंधळलेले आहे व विद्यापीठाने दिलेल्या संपर्क क्रमांक नॉट रीचेबल दाखवत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी नेमके काय करावे त्यांना होणारा मानसिक ताण सहन करावा लागत आहे. यामधून कुठलीही दुर्घटना किंवा  विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान झाल्यास  सर्वस्वी जबाबदारी विद्यापीठाने घेण्यात यावी अन्यथा विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे..

- विशाल लक्ष्मण नंदागवळी, एम कॅाम चा विद्यार्थी, श्री शिवाजी महाविद्यालय अकोला.