23 नोव्हेंबरपासून शाळा सूरू, शिक्षकांना कोविड चाचणी बंधनकारक!

सकाळ वृत्तसेवा | Wednesday, 18 November 2020

राज्यातील सरकारी अनुदानित तसेच खासगी व्यवस्थापनाच्या नववी ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा आणि त्याचे वर्ग २३ नोव्हेंबरला सुरू करण्याचे आदेश शिक्षण मंत्र्यांनी दिले आहेत.

अकोला ः राज्यातील सरकारी अनुदानित तसेच खासगी व्यवस्थापनाच्या नववी ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा आणि त्याचे वर्ग २३ नोव्हेंबरला सुरू करण्याचे आदेश शिक्षण मंत्र्यांनी दिले आहेत.

त्या पार्श्वभूमीवर १७ ते २२ नोव्हेंबरपर्यत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळेशी संबंधित असलेल्या इतर कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी केली जाणार आहे. शासनाने तसे आदेश सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

कोरोना विषाणूने मार्च महिन्यापासून सर्वत्र थैमान घातला आहे. त्यामुळे २३ मार्चपासून शाळांना सुट्या देण्यात आल्या होत्या. कोरोनामुळे सर्वत्र २४ जूनपासून पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतचे अध्यापक व अध्ययन कार्य आतापर्यंत ऑनलाइन पद्धतीने सुरू होते.

मात्र आता राज्यात काहीसा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने शालेय शिक्षण विभागाकडून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्यातील सर्व शाळा येत्या काळात टप्प्याटप्प्याने सुरू करण्यासाठी सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा सुरळीतपणे सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मागील चार दिवसांपूर्वी शासन निर्णय जारी केला असून, नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग आणि शाळा सुरू केल्या जाणार आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)