शिरपूर झाले दुधाचे गाव!, दररोज होतेय हजारो लीटर दुधाची आवक
हे गाव दुग्धव्यवसायात सदैव अग्रेसर आहे. येथे दररोज पाच ते सात हजार लीटर दूध विक्रीस येत असल्याचे डेअरी व्यावसायिकांकडून कळते. दुधामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते. येथे दुधासह दुग्धजन्य पदार्थ देखील मोठ्या प्रमाणात बनवून विक्री केले जातात.
शिरपूर जैन (जि.वाशीम) : हे गाव दुग्धव्यवसायात सदैव अग्रेसर आहे. येथे दररोज पाच ते सात हजार लीटर दूध विक्रीस येत असल्याचे डेअरी व्यावसायिकांकडून कळते. दुधामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते. येथे दुधासह दुग्धजन्य पदार्थ देखील मोठ्या प्रमाणात बनवून विक्री केले जातात.
येथे शेती हा मुख्य व्यवसाय असून, शेती बरोबरच दुधाचा व्यवसाय करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. शिरपूर सह वसारी, दुधाळा, वाघी, खंडाळा, बोराळा, ढोरखेडा, कोठा, घोडमोड किन्ही, पांगरखेडा, तिवळी, एकांबा, करंजी, शेलगाव इंगोले, शेळगाव बगाडे येथून मोठ्या प्रमाणात दूध विक्रीस येते. येथे तीन मोठ्या स्वरूपातील डेअरी आहेत.
तर काही छोट्या-छोट्या डेअरी सुद्धा येथे आहेत. सर्वांकडे दररोज प्रत्येक ऋतूत सकाळ-संध्याकाळ जवळपास पाच ते सात हजार लीटर दूध विक्रीस येते. शिरपूर हे दुधाच्या बाबतीत जिल्ह्यात एक नंबर वर आहे.
दररोज विक्रीस येणारे दूध भरपूर प्रमाणात असल्याने त्याची येथे विक्रीही मोठी होती. त्यातून शिल्लक राहिलेले दूध हे शासकीय दूध डेअरी वर पाठवले जाते. येथे दुधापासून उत्तम प्रतीचा पेढा, पनीर, श्रीखंड, बासुंदी, दही, तूप आदी पदार्थ बनवून विकले जातात. दूध विक्रीस आणणाऱ्या शेतकऱ्यांना डेअरी व्यवसायिकांकडून हप्त्याला, दहा दिवसाला किंवा दररोज नगदी स्वरूपात पैसे वाटप केले जातात.
मालेगाव सारख्या तालुक्याच्या ठिकाणी देखील येथून दूध पुरवले जाते. शिरपूर व परिसरात दूध उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असून, शेती बरोबर जोड धंदा म्हणून हा व्यवसाय करणारे बहुतांश शेतकरी हे पहायला मिळतात. दुधामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक हातभार मिळतो. त्यामुळे शिरपूर हे दुधासाठी नेहमीच अग्रेसर राहिलेले आहे.
शिरपूर येथे दररोज जवळपास पाच ते सात हजार लीटर दूध विक्रीस येते. काही दुधापासून पेढा, पनीर, दही, बासुंदी, श्रीखंड, दही, तूप आदी पदार्थ येथे बनवले जातात. तर शिल्लक राहिलेले दूध वाशीम येथे शासकीय दूध डेअरीस पाठवण्यात येते. तसेच येथील शेतकऱ्यास गरज पडल्यास म्हशी विकत घेण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी लागणारी ढेप, चारा अशा प्रकारच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आम्ही त्यांना वेळोवेळी आर्थिक मदतही करतो.
-पंकज देशमुख, खासगी दूध डेअरी संचालक, शिरपूर.
(संपादन - विवेक मेतकर)