
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेल्या शिवभोजनाचा जिल्ह्यातील सहा लाखांवर कष्टकऱ्यांनी लाभ घेतला आहे. गत ९ महिन्यात शिवभोजन थाळीने केवळ पाच रुपयातच कष्टकऱ्यांची भूक भागवल्याने सदर योजना अल्पावधीच लोकप्रिय ठरली आहे.
अकोला ः राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेल्या शिवभोजनाचा जिल्ह्यातील सहा लाखांवर कष्टकऱ्यांनी लाभ घेतला आहे. गत ९ महिन्यात शिवभोजन थाळीने केवळ पाच रुपयातच कष्टकऱ्यांची भूक भागवल्याने सदर योजना अल्पावधीच लोकप्रिय ठरली आहे.
कोरोना विषाणूमुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात शिवभोजन थाळ्यांची विक्री पॅकेट्स स्वरुपात करण्यात आली. त्यामुळे टाळेबंदीत सदर योजना गरीबांसाठी लाभदायी ठरली.
शिवभोजन योजनेअंतर्गत गरीब व गरजू लोकांना १० रुपयात जेवण उपलब्ध करून द्यायचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. प्रायोगिक तत्वावर जिल्ह्याचं मुख्यालय असणाऱ्या ठिकाणी ही योजना राबवण्यात आली.
त्याअंतर्गत अकोला महापालिका क्षेत्रात सुरवातीच्या काळात दोन ठिकाणी थाळी केंद्र सुरू करण्यात आले. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने सुरुवातीला जिल्ह्यासाठी ३०० थाळींची तरतूद केली होती.
परंतु त्यानंतर योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे शिवभोजन थाळींची संख्या दुप्पट करण्यात आली होती. अल्पावधीतच सदर योजना नागरिकांसाठी लाभयादी ठरत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान सदर योजनेअंतर्गत नऊ महिन्यात सहा लाख नागरिकांच्या पोटाची भूक क्षमविली आहे.
दहा वरुन थाळीची किंमत पाच रुपयांवर
शिवभोजन थाळीची विक्री सुरू झाल्यानंतर सुरुवातीला एक थाळीची किंमत दहा रुपये ठेवण्यात आली होती. परंतु नंतर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता थाळीची किंमत दहा रुपयावरुन पाच रुपये करण्यात आली. त्यामुळे गत पाच-सहा महिन्यांपासून शिवभोजन थाळीचे वाटप पाच रुपयातच करण्यात येत आहे.
संस्थेला ४५ रुपयांचे अनुदान
शिवभोजन योजनेची थाळी ही ५० रुपयाला असून ही योजना राबविणाऱ्या संस्थेला सध्या ४५ रुपये अनुदान स्वरूपात सरकार देत आहे. ही योजना सुरुवातीला तीन महिने प्रायोगिक तत्वावर चालवण्यात आली. परंतु आता योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे.
जिल्ह्यात १३ ठिकाणी विक्री
शिवभोजन थाळीचे लक्षांक वाढलेले असतानाच त्याच्या विक्री केंद्रांमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात १३ ठिकाणी शिवभोजन थाळीची विक्री करण्यात येत आहे. महानगरात कृषी उत्पन्न बाजार समिती, सर्वोपचार रुग्णालय व जिल्हा महिला रुग्णालयाजवळ शिवभोजन थाळ्यांची विक्री करण्यात येत आहे.
शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन थाळीला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. २६ जानेवारीपासून जिल्ह्यात सुरू झालेल्या शिवभोजन विक्री केंद्रातून आतापर्यंत सहा लाख थाळ्यांची विक्री करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात १३ केंद्र सुरू आहेत.
- बी.यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला
(संपादन - विवेक मेतकर)