ज्वारीच्या कणसाला फुटले कोंब, खरीपातील पिकांवर फेरले पाणी

मनोज भिवगडे
Thursday, 24 September 2020

सातत्याने पाऊस होत असल्याने पावसामुळे मूग, उडीद, सोयाबीन पाठोपाठ आता ज्वारीच्या पिकाचेही नुकसान होऊ लागले आहे. काही ठिकाणी ज्वारीच्या कणसातून कोंब बाहेर येत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अकोट तालुक्यात ज्वारीतून कोंब बाहेर येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

अकोला :  सातत्याने पाऊस होत असल्याने पावसामुळे मूग, उडीद, सोयाबीन पाठोपाठ आता ज्वारीच्या पिकाचेही नुकसान होऊ लागले आहे. काही ठिकाणी ज्वारीच्या कणसातून कोंब बाहेर येत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अकोट तालुक्यात ज्वारीतून कोंब बाहेर येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

गेली काही वर्षे ज्वारीचे पीक अत्यंत कमी क्षेत्रावर लागवड केले जात होते. जिल्हयात या खरीप हंगामात ज्वारीच्या क्षेत्रात वाढ होऊन ते ५७०० हेक्टरपर्यंत पोचले. सध्या ज्वारीचे पीक कुठे कणसातील दाणे भरण्याच्या तर कुठे दाणे परीपक्व होत असल्याच्या अवस्थेत आहे. अशातच गेले आठवडाभर ढगाळ वातावरण व चार ते पाच दिवस सलग पाऊस होत असल्याने या पिकाला फटका बसू लागला आहे. प्रामुख्याने ज्वारीचे कणीस परिपक्व झालेल्या शेतात कोंब बाहेर निघू लागले आहेत.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

यंदा जिल्ह्यात मूग, उडीद पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेलेले आहे. त्यानंतर सोयाबीन पिकाचेही नुकसान झाले आहे. या प्रमुख पिकांची दुरवस्था झाल्याने चिंतातूर झालेल्या शेतकऱ्याला आता ज्वारी पिकाबाबतही अनिश्‍चितता झेलावी लागत आहे. ज्वारीच्या पिकावर तेल्हारा, अकोट तालुक्यात काही दिवसांपूर्वीच हिरवी व जाळे करणाऱ्या अळीचे आक्रमण झाले होते. यातही मोठे नुकसान झाले. त्यानंतर आता अतिपावसाचा हा फटका बसला.

हेही वाचा - चिमुकल्याला वाचवण्यासाठी बापाची पुरात झुंज, काटेपूर्णा नदीपात्रात वाहून जाणारे दोघेही बापलेक सुखरुप

या हंगामात साडेतीन एकरात ज्वारीची लागवड केली आहे. आमच्या भागात इतर शेतकऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात ज्वारीची लागवड आहे. सततच्या पावसाने ज्वारीच्या कणसातून कोंब बाहेर आले आहेत.
- हरीदास पायघन, शेतकरी, पणज ता. अकोट. जि. अकोला.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Sorghum sprouts sprouted, damage to kharif crops