शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजाराच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 24 October 2020

निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील काही वर्षांपासून दुष्काळाशी दोन करत असलेल्या शेतकऱ्यांना परतीच्या संततधार पावसाने यंदाही दुष्काळाच्या खाईत लोटले. परंतू या आपत्तीतही सत्ताधारी व विरोधी गटातील राज्यकर्ते राजकारणात मश्गुल असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आठ दिवसांत हेक्टरी २५ हजार सरसकट भरपाई द्यावी.

वाशीम  : निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील काही वर्षांपासून दुष्काळाशी दोन करत असलेल्या शेतकऱ्यांना परतीच्या संततधार पावसाने यंदाही दुष्काळाच्या खाईत लोटले. परंतू या आपत्तीतही सत्ताधारी व विरोधी गटातील राज्यकर्ते राजकारणात मश्गुल असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आठ दिवसांत हेक्टरी २५ हजार सरसकट भरपाई द्यावी.अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यव्यापी आंदोलन उभारणार असल्याची माहिती ता. २३ ऑक्टोबर रोजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिली.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी विदर्भ दौऱ्यावर असताना वाशीममध्ये आले असता आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

याप्रसंगी त्यांच्या समवेत संघटनेचे विदर्भ अध्यक्ष दामुअण्णा इंगोले, अ‍ॅड.नरवाडे, राम अंभोरे, प्रमोद बिल्लारी आदि पदाधिकारी उपस्थित होते.अधिक माहिती देताना तुपकर म्हणाले की, यंदाच्या खरिपात सुरुवातीला वेळी अवेळी झालेला पाऊस व बोगस बियांण्यांमुळे बहुतांश शेतकऱ्यांना दुबार तर काहींना तिबार पेरणी करावी लागली.

या नंतर पिके काढणीला आली असताना परतीच्या पावसात वाहून गेली. या आपत्तीत कसेबसे हाती आलेले पीक शेतकऱ्यांना मातीमोल भावाने विकावे लागत असल्याची विदारक स्थिती आहे.

या परिस्थितीत केंद्र व राज्य शासनात श्रेयासाठी वाद सुुरू असून, राजकीय पुढारी संकटातील शेतकर्‍यांना मदत करण्या ऐवजी राजकारण करत असून, शासनाने जाहीर केलेली मदत अत्यंत तोकडी असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. या नैसर्गिक आपत्तीत स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीर उभी असून शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार मदत द्यावी, हमीभावा पेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई व्हावी, पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे आदि प्रमुख मागण्या आठ दिवसात पुर्ण कराव्यात. अन्यथा, स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरुन राज्यव्यापी आंदोलन उभारणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: State-wide agitation for demand of Rs 25,000 per hectare for farmers