वादळ वाऱ्यासह पावसाचा फटका,वीज यंत्रणा बाधीत

विवेक मेतकर
Monday, 12 October 2020

काल दुपारी तुफान वाऱ्यासह झालेल्या पावसाचा मोठा फटका महावितरण यंत्रणेला बसला आहे. परिणामी वादळासह आकाशातील विजांच्या प्रचंड कडकडाटाने अकोला शहरासह ग्रामीण भागाची वीज यंत्रणा प्रभावीत होऊन अनेक भागाचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.

अकोला :  काल दुपारी तुफान वाऱ्यासह झालेल्या पावसाचा मोठा फटका महावितरण यंत्रणेला बसला आहे. परिणामी वादळासह आकाशातील विजांच्या प्रचंड कडकडाटाने अकोला शहरासह ग्रामीण भागाची वीज यंत्रणा प्रभावीत होऊन अनेक भागाचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.

वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण यंत्रणा लागलीच कामाला लागली आहे ,त्यामुळे ग्राहकांनी या काळात सहकार्य करावे असे आवाहन अकोला मंडळ कार्यालयाकडून करण्यात येत आहे.

अचानक झालेले वादळ एवढे जोरात होते की, त्यामुळे महावितरणचे ११ केव्हीचे ३० फिडर आणि ३३ केव्हीचे ५ उपकेंद्रे ही ब्रेकडाऊनमध्ये गेली होती. पण अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट  यांच्या मार्गदर्शनात सर्व विभागीय कार्यकारी अभियंते व कर्मचाऱ्यांच्या युध्दस्तरावरील प्रयत्नाने ब्रेक डाऊनमधील ३० फिडरपैकी १८ फिडरचा वीज पुरवठा पुर्ववत करण्यात महावितरण यंत्रणेला यश आले आहे.

पण अजूनही जिल्ह्यातील १२ फिडर व ३३ केव्हीचे विझोरा, बार्शिटाकळी, मोहदा, हातरून आणि मनात्री ही ५ उपकेंद्र ब्रेकडाऊनमध्येच आहे.

कृषी फिडर वगळता शहर व गावठाण फिडरचा वीज पुरवठा पुर्ववत करण्याच्या कामाला प्राधान्य देत महावितरण कर्मचारी कार्यरत आहेत.

अकोला शहराचा विचार केला तर अजूनही ११ केव्ही तारफैल, ११ केव्ही RPTS, ११ केव्ही न्यु तापडीया आणि ११ केव्ही शिवशक्ती हे चार फिडर ब्रेकडाऊनमध्ये असल्याने या फिडरवरील वीज ग्राहकांचा वीज पुरवठा बंद आहे.

रात्रीची वेळ असल्याने वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी फॉल्ट शोधणे हे मोठे जीकीरीचे असते. फॉल्ट शोधून तो दुरूस्त करण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांचे युध्दस्तरावरील प्रयत्न सुरू आहे. या संपूर्ण बाबीकडे मुख्य अभियंता अनिल डोये हेही लक्ष ठेऊन आहे.

 वादळासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून वीज वाहिन्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच महावितरणची वीज आणि आकाशातील विजांचा संयोग होऊन वीज भार वाढून अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांचे इन्सुलेटर फुटले असण्याची किंवा इन्सुलेटर पंक्चर होण्याची  शक्यताही मोठ्या प्रमाणात असते.

अशावेळी वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी त्या वीज वाहिन्यांची संपूर्ण पेट्रोलींग करून फॉल्ट शोधावे लागते.त्यामुळे या काळात ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन अकोला मंडळ कार्यालयाकडून करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Storms and rains hit the power system