नाथाभाऊंच्या राजीनाम्यानंतर समर्थकांचे फोन ‘नॉटरिचेबल’

मनोज भिवगडे | Thursday, 22 October 2020

भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्‍वाचा राजीनामा दिल्याने त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

अकोला :  भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्‍वाचा राजीनामा दिल्याने त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

नाथाभाऊ नावाने लोकप्रिय असलेले खडसे यांचे अकोला भाजपमध्येही अनेक समर्थक आहेत. त्यांचे फोन आता ‘नॉटररिचेबल’ झाले असून, ते ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत. येत्या काळात अकोल्यातील राजकीय पटलावर अनेक चेहरे व त्यांच्या पाठीवर असलेले पक्षाचे लेबलही बदलले दिसतील.

महाराष्ट्र भाजपमध्ये नाथाभाऊंचे एक वलय होते. त्यांनी खानदेश, विदर्भातील राजकीय क्षेत्रात अनेक कार्यकर्ते जोडले होते. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील माजी आमदार नारायणराव गव्हाणकर हे त्यांचे खंदे समर्थक मानले जातात. याशिवाय माजी नगरसेवक गोपी ठाकरे हेही नाथाभाऊंचे निकवर्तीय आहेत.

आता नाथाभाऊंनी भाजप सोडल्यामुळे अकोला जिल्ह्यात त्यांच्या समर्थकांना पेच पडल आहे. यापूर्वी गव्हाणकर यांनी भाजप सोडून काँग्रेसशी जवळीक साधली होती. मात्र, ते तेथे फार रमले नाहीत. गोपी ठाकरेही भाजपपासून दुरावले होते. मात्र, तेही पुन्हा भाजपमध्ये परत आले. आता नाथाभाऊंच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या या समर्थकांच्या निर्णयाकडे अकोल्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीत ‘भाऊ’गर्दी
अकोला जिल्ह्यात अलीकडच्या काळात काही दिग्गज नेत्यांनी प्रवेश केला आहे. त्याची सुरुवात माजी राज्यमंत्री गुलाबरावभाऊ गावंडे यांच्यापासून झाली होती. त्यांचे चिरंजीव संग्रामदादा गावंडे यांच्याकडे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर अकोला जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का देत राष्ट्रवादीने दोन माजी आमदारांना प्रवेश दिला आहे. त्यात अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांचा समावेश आहे.

बाळापूरवरून अडू शकते घोडे
नाथाभाऊंचे समर्थक नारायणराव गव्हाणकर आणि त्यांचे चिंरजीव मुकेश गव्हाणकर यांनी बाळापूर विधानसभा मतदारसंघावर भाजपकडून दावा केला होता. आताही पिता-पुत्राची इच्छा लपून नाही. त्यामुळे नाथाभाऊंनी भाजप सोडल्यानंतर गव्हाणकर यांचा राष्ट्रवादीत जाताना बाळापूर मतदारसंघावर दावा राहू शकतो. या मतदारसंघात आधीच जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी गतवेळी निवडणूक लढविण्यानंतर आता नव्याने तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे माजी आमदार बळीराम सिरस्कारसुद्धा राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे गव्हाणकरांचे नाथाभाऊंसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे घोडे बाळापूर मतदारसंघावरून अडू शकते.

(संपादन - विवेक मेतकर)