esakal | Success Story: घरूनच काम करून महिन्याला हजारोंची उलाढाल, मार्केटिंग, ब्रॅंडिंगद्वारे फुलविला आळिंबी व्यवसाय
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Thousands of Monthly Turnover by Working from Home, Marketing, Branding

विलास व छायाताई या कुयटे दांपत्याने धिंगरी अळिंबी (मशरूम) व्यवसाय सुरू केला. दर्जेदार निर्मितीवर भर देत चिकाटी, थेट ग्राहकांना भेटून, माहितीपत्रकांद्वारे ‘प्रमोशन’ करून विक्री व्यवस्थेवर मेहनत घेतली.

Success Story: घरूनच काम करून महिन्याला हजारोंची उलाढाल, मार्केटिंग, ब्रॅंडिंगद्वारे फुलविला आळिंबी व्यवसाय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

बेलखेड (जि. अकोला):  येथील विलास व छायाताई या कुयटे दांपत्याने धिंगरी अळिंबी (मशरूम) व्यवसाय सुरू केला. दर्जेदार निर्मितीवर भर देत चिकाटी, थेट ग्राहकांना भेटून, माहितीपत्रकांद्वारे ‘प्रमोशन’ करून विक्री व्यवस्थेवर मेहनत घेतली.

महिन्याला ३० हजार ते ४५ हजार रुपयांची उलाढाल करण्यात ते यशस्वी झाले. ताज्या, सुकवलेल्या व प्रक्रियायुक्त अशा विविध प्रयत्नांमधून व्यवसाय नावारुपाला आणण्यात त्यांनी यश मिळवले.

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुका शेतीवर अवलंबून आहे. सुपीक जमीन, सिंचनासाठी पाणी उपलब्ध असल्याने वर्षातून दोन हंगाम बहुतांश शेतकरी साधतात. तालुका मुख्यालयापासून चार किलोमीटरवर असलेल्या बेलखेड गावातील विलास व छायाताई या कुयटे कुटुंबाचा देखील शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. पाच एकरांत कापूस, हरभरा आदी पिके ते घेतात. नैसर्गिक आपत्ती, किडी- रोगांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खर्च वाढला असून, तुलनेने उत्पादन समाधानकारक मिळत नसल्याचे ते म्हणतात. त्यामुळे शेतीला आधार म्हणून दांपत्याने अळिंबी (मशरूम) निर्मिती व्यवसायाची निवड केली.

व्यवसायाची सुरुवात
जळगाव जामोद कृषी विज्ञान केंद्रातून प्रशिक्षण तसेच कौशल्य विकास शिक्षण घेतले.
तीन वर्षांपूर्वी घरातील खोलीत तर सद्यःस्थितीत घराला लागूनच स्वतंत्र शेडमध्ये धिंगरी मशरूमचे (अळिंबी) उत्पादन घेण्यात येते. हा परिसर स्वच्छ ठेवला जातो. हवा खेळती राहावी अशी व्यवस्था केली आहे. अकोला जिल्ह्यात तापमान अधिक राहते. त्यामुळे मशरूम उत्पादनात तापमान हा मोठा अडसर असतो. मात्र शेडमधील आर्द्रता टिकून राहावी यासाठी फवारणी पंपाद्वारे दिवसभरात गरजेनुसार तीन ते चार वेळा पाण्याचा फवारा करण्यात येतो. शेडवर टीनपत्रे असल्याने उष्णता कमी करण्यासाठी अधिक जागरूकता बाळगावी लागते. तीन वर्षांतील अनुभवामुळे आता तापमान नियंत्रण करणे शक्य झाले आहे. वेळच्यावेळी मशरूमची काढणी करून त्याचे वर्गीकरण केले जाते.

विक्री व्यवस्था उभारली
तेल्हारा तालुक्यात मशरुमची लोकप्रियता किंवा जागरूकता म्हणावी तेवढी नव्हती.
मात्र कुयटे यांनी त्यासाठी अथक मेहनत घेतली. आपल्या गावापासून तीस किलोमीटर परिघातील गावांमध्ये ते दररोज टू व्हीलरवरून फिरतात. त्यासाठी व्हिजिटिंग कार्ड तयार करून घेतली आहेत. ग्राहकांना भेटणे, त्यांना कार्डस देणे व थेट विक्री करणे हा कुयटे यांचा रोजचा दिनक्रम असतो.
मशरूमचे महत्त्व ग्राहकांना पटवून देण्यासाठी माहितीपत्रक छापले आहे. यामध्ये मशरूम खाण्याचे फायदे, त्यातील पोषक घटक यांची सविस्तर माहिती दिली आहे. या प्रयत्नातूनच ग्राहकांचे नेटवर्क उभे करणे शक्य झाले आहे.

दिवसभराची विक्री
दररोज सुमारे तीन ते चार किलो उत्पादन होते. ताज्या मशरूमला अधिक मागणी असते. प्रतवारीनुसार दर मिळतो. शंभर ग्रॅमचे पॅकिंग तयार केले जाते. त्याची १०० रुपये किंमत आहे. दिवसभरात १० ते २० पॅकेट किंवा किमान हजार रुपयांची विक्री होते. या प्रयत्नांतून महिनाभरात साधारणपणे ३० हजार ते ४५ हजार रुपयांपर्यंत उलाढाल नेण्यापर्यंत कुयटे यांनी मजल मारली आहे.

मूल्यवर्धन
उन्हाळ्याचे काही महिने वगळता किमान आठ महिने व्यवसाय सुरू असतो. उत्पादनाची जबाबदारी छायाताई तर विक्री व्यवस्था विलास सांभाळतात. दोन्ही मुलेदेखील आपल्यापरीने मदत करतात. सर्वच मशरूमची विक्री होईल अशी बाजारपेठ स्थानिक पातळीवर नाही. यामुळे दररोजच्या विक्रीतून जे मशरुम शिल्लक राहते ते वाळविण्यात येते. त्यापासून पावडर तयार केली जाते. ग्राहकांच्या मागणीनुसार व आवडीनुसार मशरूमचे पापड, लोणची, वड्या, आटा ही उत्पादने तयार केली जातात. सततच्या प्रयत्नांनंतर ग्राहकांच्या मानसिकतेत मोठा बदल झाला असल्याचे कुयटे सांगतात. आता पंचक्रोशीत या उत्पादनांनी ओळख तयार केली आहे.

विविध प्रदर्शनात सहभाग
कृषी खाते, कृषी विद्यापीठ तसेच कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून या भागात भरविल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रदर्शनात कुयटे मशरूमचे दालन लावतात. या ठिकाणी उत्पादन विक्रीसोबतच मालाच ब्रॅण्डिंग होण्यासही मोठा हातभार लागतो आहे. प्रदर्शनात सक्रिय सहभागासाठी प्रमाणपत्र देऊन वेळोवेळी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

मार्गदर्शकाच्या भूमिकेत
विक्रीसाठी कुयटे महाविद्यालये, दवाखाने, धान्य विक्री केंद्रे आदी ठिकाणीदेखील भेटी देतात.
मशरूम उत्पादनाचे तंत्र जाणून घेण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी त्यांच्या अळिंबी प्रकल्पाला भेट देतात. स्पॉन, ‘बेड’ बनविण्यासाठी सोयाबीन, गव्हाच्या काड तयार करणे (उकळणे, निर्जंतुकीकरण, प्लॅस्टिक पिशवीत ठेवणे, त्याला छिद्र पाडणे, बेडवर पाणी शिंपडणे, काही दिवसांनी प्लॅस्टिक काढून घेणे, बुरशी तयार होऊ नये यासाठी खबरदारी बाळगणे) अशा प्रकारची माहिती विद्यार्थ्यांना तसेच नव्याने उद्योग सुरू करण्यास उत्सुक असलेल्यांना कुयटे दांपत्य देते.

अडचणींवर मात-
या व्यवसायासाठी सुरुवातीला सुमारे साडेतीन लाख रुपये भांडवल उभारावे लागले. व्यवसाय सुरू करण्यासाठी कुठलेही कर्ज काढले नाही. टप्प्याटप्प्याने तो वाढविण्यात येत आहे. शिवाय शेडमध्येही सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे. आता आर्थिक स्रोत तयार झाल्याने घर उभारणी, मुलांना चांगले शिक्षण देणे शक्य झाले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image