शिक्षणाचा नवा फार्मूला :गावकरीच झाले शिक्षक, नोकरदारांच्या तालमित वाचा कसे घडतायेत विद्यार्थी

श्रीकृष्ण शेगोकार
Saturday, 5 September 2020

अत्यंत दुर्गम भागात डोंगराच्या कुशीत एक हजार लोकवस्तीचं गाव शेकापूर. येथील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची ओढ. त्यामुळेच गावातील नोकरदारांनी ज्ञानाची गंगा गावापर्यंत आणली. गावातील मुलांनी चांगले शिक्षण घेवून शासनाच्या विविध विभागात चांगल्या हुद्द्यावर नोकरी मिळवली.

पातूर (जि.अकोला) : शिकले, सवरले आणि नोकरीच्या निमित्ताने गावापासून दूर गेले. मात्र गावाची ओढ कायम राहली. आपल्या प्रमाणेच गावातील गोरगरीबांची मुलंही शिकावी आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे या उद्देशाने पातूर तालुक्यातील शेकापूरच्या नोकदारांनी सामाजिक बांधिलकी जोपासात अभ्यासिका सुरू केली. त्यांचे शिक्षक होऊन योग्य मार्ग दाखविला.

अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागात डोंगराच्या कुशीत एक हजार लोकवस्तीचं गाव शेकापूर. येथील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची ओढ. त्यामुळेच गावातील नोकरदारांनी ज्ञानाची गंगा गावापर्यंत आणली. गावातील मुलांनी चांगले शिक्षण घेवून शासनाच्या विविध विभागात चांगल्या हुद्द्यावर नोकरी मिळवली.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्यात डॉक्टर, इंजिनियर, कृषी अधिकारी, आयुक्त, पोलिस निरीक्षक, वन अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षकांचा समावेश आहे. आपल्याप्रमाणेच गावातील गरीब कुटुंबातील मुलंही चांगले शिकून पुढे जावे, अशी उच्च विचारसरणी ठेवून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत गावात गोरगरीब विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी गोर वसंतराव नायक अभ्यासिका वर्ग सुरू केला.

जुलै २०१८ मध्ये सुरू झालेल्या या अभ्यासिकेला विद्यमान सरपंच गोकरणाबाई शेळके व सचिव राहुल उंदरे यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतचा हॉल उपलब्ध करून देण्यात आला आहे. सचिव उंदरेसह नोकरदारांनी अभ्यासिका वर्गात स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त मार्गदर्शिका, शेकडो पुस्तके उपलब्ध करून दिली. गावातील शिक्षक किशोर शंकर राठोड व अनिल हिरासिंग राठोड हे दीर्घ सुट्ट्यांमध्ये गावी परतल्यावर गावातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करतात.

विद्यार्थीच चालवतात अभ्यासिका
शेकापूरचा अभ्यासिका वर्ग स्वयंशिस्तीने चालतो. गावातील मोठे विद्यार्थीच लहान विद्यार्थ्यांना शिस्तीत अभ्यासिकेत वागायला शिकवतात. एवढेच नव्हे तर पोलिस भरतीसाठी शारीरिक कसरत करण्यासाठी ग्रामपंचायतीने ग्राउंड उपलब्ध आहे. त्याची कामे लोकवर्गणीतून करण्यात आली आहे.

गावात मोबाईल रेंजच नाही
गावात अभ्यासिका सुरू झाली. मात्र मोबाईला रेंजच मिळत नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या ऑनलाइन शाळांपासून येथील विद्यार्थी मुकले आहेत.
 
जिल्हा परिषद उपाध्यक्षांचे गाव
विद्यमान जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्रीबाई हिरासिंग राठोड याच गावातील आहे. त्यांनी शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा करून अभ्यासिकेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी संगणक संच उपलब्ध करून द्यावे व पुस्तकांचा संग्रह करून द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांसह गावकरी करीत आहेत.

गावातील लोकांनी स्वयंप्रेरणेने हाती घेतलेला उपक्रम अत्यंत अभिनंदनीय आहे. ग्रामपंचायतीने फंडातून पुस्तके हॉल व यानंतर वॉटर फिल्टर सुद्धा उपलब्ध करून देणार आहे. असून भविष्यात जे काही पुस्तके लागतील ते देण्यासाठी ग्रामपंचायत नेहमीच सहकार्य करेल.
- राहुल उंदरे, ग्रामविकास अधिकारी, शेकापूर

गोर वसंतराव नायक अभ्यासिका वर्गामध्ये गावातील पहिली पासून ते पदवी अभ्यासक्रापर्यंतचे विद्यार्थी अभ्यासाला येतात. गावकऱ्यांनीच या अभ्यासिका वर्गासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यात.
- अविनाश राठोड, विद्यार्थी, गोर वसंतराव नायक अभ्यासिका वर्ग, शेकापूर
(संपादन -  विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: In the village of Pathur, teachers and employees are undergoing training