
तुझा मोबाईल मला का देत नाही ? या कारणावरून मालेगाव येथील आठवडी बाजारामध्ये एका पानटपरी चालकाने लोखंडी विळे विकणाऱ्या एका १६ वर्षीय मुलावर धारदार चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी (ता. ८) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. मुलाला जखमी केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
मालेगाव (जि.वाशीम) : तुझा मोबाईल मला का देत नाही ? या कारणावरून मालेगाव येथील आठवडी बाजारामध्ये एका पानटपरी चालकाने लोखंडी विळे विकणाऱ्या एका १६ वर्षीय मुलावर धारदार चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी (ता. ८) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. मुलाला जखमी केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
नितेश सुभाष चव्हाण (वय १६) रा. तालुका परतुर जिल्हा जालना हल्ली मुक्काम मालेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तो व त्याचे कुटुंबीय लोखंडी विळे तयार करून गावोगावी विकण्याचे काम करतात.
मंगळवारी (ता. ८) फिर्यादी हा येथील आठवडी बाजारामध्ये विळे विकत असताना धांदल चौकातील पानटपरीवर पान घेण्यासाठी थांबला होता. तेवढ्यात त्याला मोबाईल कॉल आला असता त्यावर तो मोबाईल वर बोलत होता.
तेव्हा पानटपरीच्या बाजूला असलेल्या गणेश विजय दाभाडे उर्फ माया रा. गांधीनगर याने त्याला तुझा मोबाईल दे असे म्हटले असता फिर्यादी नितेशने त्याला नकार दिला.
तेव्हा आरोपीने त्याच्या जवळील धारदार चाकूने जिवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या छातीवर व हातावर जोरदार वार केले. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. आजूबाजूच्या लोकांनी आरोपी दाभाडे ला पकडल्यामुळे तो सुटला आणि पळतच जखमी अवस्थेत घरी गेला.
त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्याला पोलिस स्टेशनमध्ये नेऊन घटनेसंदर्भात लेखी दिली. त्यावरून स्थानिक पोलिसांनी आरोपी गणेश दाभाडे उर्फ माया याच्याविरुद्ध भादविच्या विविध कलमा नुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास ठाणेदार आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गव्हाणे हे करीत आहेत. फिर्यादी हा सध्या वाशीम येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असून, आरोपी गणेश दाभाडे हा अजूनही फरार आहे.
(संपादन - विवेक मेतकर)