शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणीही गेले सुकून, पंचनामे कधी होणार; नुसता निवेदनाचाच महापूर

Akola News: When will the panchnama take place; Just a flood of statements
Akola News: When will the panchnama take place; Just a flood of statements

वाशीम :  गेल्या आठ दिवसात जिल्ह्यात झालेल्या अवकळी पावसाने सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र या नुकसानीचे पंचनामे शासनादेशाच्या अटीत अडकले असून, आता मदतीची आस धरलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणीही सुकून जात आहे. लोकप्रतीनिधी केवळ निवेदनाचे सोपस्कार पार पाडत असून, शासनादेशाच्या अटी शिथिल करण्यास मात्र कोणीच पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे.


जिल्ह्यात गेल्या दहा दिवसापासून पावसाने थैमान घातले आहे. वर्षभर राबराब राबून पिकविलेले सोन्यासारखे सोयाबीन पावसाने मातीत मिसळून जाताना शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झाले होते. वर्षभराची मेहनत पाण्यात गेल्याने जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीत शासनाने मदत करणे अपेक्षित असताना पंचनाम्याच्या आदेशात १३ मे २०१५ च्या शासनादेशाच्या निकषानुसार पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

या परिस्थितीत तत्कालीन भाजप सरकारने काढलेला तो शासनादेश विद्यमान परिस्थितीत गैरलागू ठरत आहे. जिल्ह्यात ६५ मिलीमीटर पाऊस झाला नसला तरी, सततच्या पावसाने अतिवृष्टीच्या पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. प्रशासनाकडे आदेश आले मात्र, निकषात बसत नसल्याने पंचनामे थांबले आहेत. आठदहा दिवसानंतर जर पंचनाम्याच्या कारवाईला सुरूवात झाली तर, पंचनामे करणार, असा तिढा निर्माण होवून शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भिती आहे.


कागदी घोड्यापेक्षा कृती आवश्यक
पावसामुळे शेतपीकाचे नुकसान झाले त्या संदर्भात जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मदतीबाबत व पंचनामे करण्यासंदर्भात निवेदने दिली आहेत. पंचनाम्याच्या संदर्भात २०१५ चा शासनादेश अडथळा ठरत असल्याचेही त्यांना कल्पना आहे. मात्र कागदी घोडे नाचवत आपण शेतकऱ्यांचे किती हीत जोपासतो हे सांगण्यापेक्षा २०१५ च्या शासनादेशातील अट दूर करवून घेणे महत्त्वाचे आहे. जनसामान्याच्या प्रश्नावर सोडवणूक करताना येणारे अडसर दूर करण्यासाठीच जनतेने यांना दिल्ली मुंबईत पाठविले आहे. तिथे राजधर्म निभावणे अतिशय गरजेचे आहे.


आधीच उत्पन्नात घट त्यात पावसाचा मारा
जिल्ह्यामध्ये सोयाबीन हेच मुख्य पिक आहे. प्रतिकुल हवामानाने सोयाबीनचा उतारा एकरी तीन ते चार क्विंटल येत आहे. उत्पादन खर्च निघणे अवघड झाले असताना पावसाने शेतकरी उद्‍ध्वस्त झाला आहे. कागदी वाघ बनून कागदी घोडे नाचविण्यापेक्षा शेतकऱ्यांची दिशाभूल न करता मंत्रालय स्तरावरून पंचनामे करण्याचे आदेश काढण्यासाठी दवाब निर्माण करण्याची गरज आहे. अन्यथा शेतकरी आत्महत्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com