अकाेला : खचलेल्या पुलाची दुरावस्था कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Nimbi Malokar to Kalambeshwar bridge damage

अकाेला : खचलेल्या पुलाची दुरावस्था कायम

बार्शीटाकळी : निंबी ते कळंबेश्वर रस्त्यावरील निंबीला लागून असलेला पूल खचला आहे. खचलेला पूल दुरुस्त करण्यासाठी तेथील शेतकरी, शेतमजूर यांनी जिल्हा परिषद सदस्य ते आमदार यांच्याकडे मागणी केली. परंतु, गत दोन वर्षांपासून खचलेल्या पुलाच्या समस्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्यामुळे येथील ग्रामस्थांकडून रोष व्यक्त केल्या जात आहे.

पूल खचला असल्यामुळे निंबी ते कळंबेश्‍वरला जाताना शेतकरी, शेतमजूर व इतरांना तारेवरची कसरत करावी लागते. रस्त्याने जात येत नसल्यामुळे तब्बल २० ते २५ किलोमीटरचा अधिकचा प्रवास करून शेतकऱ्यांना त्यांचे शेत गाठावे लागत असल्याने शेतकऱ्यांकडून लोकप्रतिनिधिंबाबत नाराजी व्यक्त केल्या जात आहे. गत दोन वर्षांपूर्वी पावसामुळे खचलेल्या पुलाची दुरुस्ती कधी होणार?, अशा प्रश्न संतप्त शेतकऱ्यांकडे विचारल्या जात आहे.

अकोला ते खामगाव राष्ट्रीय महामार्गावरील किराणा मार्केट ते लोणी, खराप, कळंबेश्वर, लाखनवाडा, अकोला ते पातूर हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनामधून गत चार-पाच वर्षाआधी बनवण्यात आला. त्यामधून या पुलाची निर्मिती करण्यात आली. हा रस्ता करत असताना बऱ्याच ठिकाणी अद्यापही काम पूर्ण झाले नसल्याचे दिसून येत आहे. खचलेल्या पुलामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पुलाच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयात जाऊन वारंवार तक्रारी केल्या. परंतु, शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे संबंधितांकडून दुर्लक्ष केल्या जात असल्याचे दिसून येत आहे.

निंबी मालोकार येथील शेतकऱ्यांची शेती कळंबेश्वर शेतशिवारात असल्याने त्यांना शेतीच्या कामासाठी व शेतमाल घरी आण्यासाठी निंबी ते म्हैसपूर-निंबी फाटा ते हिंगणा-म्हैसपूर-कळंबेश्वर व कळंबेश्वर ते निंबी शिवारात यावे लागते व याच मार्गे परत घर गाठावे लागते. एवढे अंतर कापण्यासाठी जवळपास ३० तासाच्यावर वेळ वाया जाते. त्यामुळे शेतकऱ्यांची व शेतमजुरांची समस्याकडे लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी निंबी मालोकार येथील त्रस्त शेतकऱ्यांकडून केल्या जात आहे.

मी, गत दोन वर्षांपासून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयात जाऊन वारंवार संबंधित अधिकाऱ्यांना खचलेल्या पुलाविषयी सांगितले आहे. परंतु, तरी देखील पुलाचे काम करण्यात आले नाही. लोकप्रतिनिधिंने लक्ष देवून खचलेल्या पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे हीच सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे.

- नीलेश मालोकार, सरपंच, निंबी मालोकार.

Web Title: Akola Nimbi Malokar To Kalambeshwar Bridge Damage Disrepair

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..