
Akola : एकच मिशन जुनी पेंशन; जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गर्दी
अकोला : जुनी पेंशन योजना व सरकारी कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी-निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर, महापालिका, नगर पालिका, नगरपरिषदा, नगर पंचायती कर्मचारी समन्वय समितीमार्फत मंगळवार (ता. १४) पासून बेमुदत संपाला सुरुवात करण्यात आली.
संपाच्या चौथ्या दिवशी सफाई कर्मचारी महापंचातच्या वतीने सात ते आठ जणांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करुन शासनाच्या उदासिन धोरणाचा निषेध केला. मोर्चात सहभागी सरकारी कर्मचारी दिवसभर आंदोलन स्थळी तळ ठोकून असल्याचे दिसून आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसरत दणाणून गेला.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या दीर्घकाळ प्रलंबित आहेत. याबाबत मध्यवर्ती संघटना व इतर संघटनांच्या मार्फत शासनाकडे चर्चा व निवेदने सादर करुन प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावेत यासाठी सततचे प्रयत्न झाले. परंतु या रास्त मागण्यांना मंजूर करण्यात न आल्याने सोमवार (ता. १४) पासून कर्मचाऱ्यांची संपाचे हत्यार उगारले.
संपाच्या चौथ्या दिवशी सर्वच शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कमालीची एकजूटता दाखवत शुक्रवारी (ता. १७) दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठान मांडले. यावेळी कर्मचाऱ्यांनी दिवसभर एकच मिशन जुनी पेंशनच्या घोषणा दिल्या. त्यामध्ये महिलांसह पुरुषांचा सुद्धा समावेश होता.
संपाला सफाई कर्मचारी महापंचायतचे राष्ट्रीय प्रवक्ता सचिन चावरे, अनिल झुंज, अर्जुन सारवान, करण सारवान, सूरज सारवान, आकाश सावते, बल्लु पारोचे, सुनील गोराने, नरेंद्र डागोर, हरनामसिंग रोहेल इत्यादींनी अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायच्या बॅनर खाली मुंडन करुन महाराष्ट्र शासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी राजेंद्र नेरकर, सुनील जानोरकर, अशोक पाटील, सागर वडाळ व इतरांची उपस्थिती होती.
कार्यालयात शुकशुकाट
विविध शासकीय कामांसाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, एसडीएम व तहसीलदार कार्यालयात पोहचणारे नागरिक शुक्रवारी पोहोचले नाही. त्यामुळे नेहमीच वर्दळीच्या ठरणाऱ्या या कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. काही विभागांमध्ये कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते, तर काही कार्यालयांना कुलूप लागलेले दिसून आले.
रुग्णालयात रुग्णांचे हाल
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील परिचारिकांनी सुद्धा सहभाग घेतला आहे. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णसेवेला संपाचा फटका बसला असून रुग्णालयातील २३५ परिचारिका संपावर गेल्या आहेत. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णसेवा प्रभावित झाली आहे.