
अकोला : पाचही पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करा
अकोला : शेगाव येथील सराफा व्यावसायिकाला मारहाण करून त्याचा लैंगिक छळ केल्याचे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेतील पाच पोलिस कर्मचाऱ्यांना चांगलेच अंगलट आले आहे. सध्या निलंबित असलेल्या या पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध न्यायालयाने ता. १३ सप्टेंबर रोजी तक्रारकर्त्याची याचिका मान्य करीत, स्थानिक गुन्हे शाखेच्या पाचही पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश सिटी कोतवाली पोलिसांना दिले आहेत.
चोरीचे सोने खरेदी केल्याप्रकरणात शेगाव येथील सराफा व्यवसायी श्याम धनराज वर्मा (४०) यांना ता. ९ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी नोटीस न देता, राहत्या घरातून मध्यरात्रीनंतर २.३० वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले होते. त्यानंतर एलसीबी कार्यालयात आणून पोलिसांनी त्यांना नग्न करून त्यांचे हातपाय दोरीने बांधून पायांवर जबर मारहाण केली. पोलिस कर्मचारी एवढ्यावर थांबले नाहीतर त्यांनी वर्मा यांच्यावर नैसर्गिक लैंगिक अत्याचारसुद्धा केला. मारहाण केल्यामुळे पाय सुजले.
कोर्टात हजर केल्यानंतर सुजलेले पाय दिसू नयेत. यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी पायावर उकळते पाणी टाकले. कोर्टासमोर काही सांगितल्यास, जीवे मारण्यासह ३०-३५ गुन्हे टाकून आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. तक्रारदार श्याम वर्मा यांना जामीन मिळाल्यावर, त्यांनी ता. १८ जानेवारीला पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यावर पोलिस अधीक्षकांनी कारवाई केली नाही.
अखेर या प्रकरणाची डीआयजी चंद्रकिशोर मीना यांच्याकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर पोलिस अधीक्षकांनी सहा पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. या प्रकरणात तक्रारकर्ते श्याम वर्मा यांनी सीआरपीसी १५६(३) नुसार पोलिसांविरूद्ध न्यायालयात धाव घेतली. सातवे तदर्थ न्यायदंडाधिकारी एस.जे. बोंद्रे यांनी सुनावणी घेत, पाच पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे सिटी कोतवाली पोलिसांना आदेश दिले आहेत.
तक्रारकर्त्याच्यावतीने ॲड. रितेश डी. वर्मा यांनी न्यायालयात बाजू मांडली. न्यायालयाने स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण (आता पीएसआय), पोलिस कर्मचारी शक्ती कांबळे, संदीप काटकर, वैद्यकीय अहवाल देणारे अनोळखी डॉक्टर आणि एलसीबीतील इतर पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.