केळी प्रक्रिया उद्योगाच्या अखंड धडपडीतून उभारले ‘स्वर्णफला’

विवेक मेतकर
सोमवार, 29 जून 2020

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून पर्जन्यमानात असमतोल आहे, त्यामुळे शेतीच्या उद्योगात वाईट स्थिती निर्माण झाली आहे. केवळ शेतीच्या उत्पादनातून शेतकऱ्यांच्या कच्च्या शेतमालाला भाव मिळणार नाही त्यामुळे शेती आधारित पुरक प्रक्रिया उद्योग सुरू केले पाहिजेत यावर साऱ्या तज्ञांचे एकमत आहे. असे असले तरी केळी पिकासाठी केलेला प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे तेल्हारा तालुक्यातील सौदळा गावातील एका महिलेने!

अकोला  ः महाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून पर्जन्यमानात असमतोल आहे, त्यामुळे शेतीच्या उद्योगात वाईट स्थिती निर्माण झाली आहे. केवळ शेतीच्या उत्पादनातून शेतकऱ्यांच्या कच्च्या शेतमालाला भाव मिळणार नाही त्यामुळे शेती आधारित पुरक प्रक्रिया उद्योग सुरू केले पाहिजेत यावर साऱ्या तज्ञांचे एकमत आहे. असे असले तरी केळी पिकासाठी केलेला प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे तेल्हारा तालुक्यातील सौदळा गावातील एका महिलेने!

छोट्याशा गावातून प्रमोदीनी ज्ञानेश्वर मेतकर यांनी केळीपासून चिप्ससारखे पदार्थ तयार केले आहेत त्यांना बाजारात चांगली मागणी आहे. केळीला चांगला भाव मिळत नसल्याने प्रक्रियेव्दारे मुल्यवर्धन हा त्यावरचा चांगला पर्याय असल्याचे त्यामुळे स्पष्ट झाले आहे. खरं तर राज्याच्या प्रत्येक विभागात अशी हंगामी किंवा भौगोलिकतेवर आधारीत फळपिके आहेत त्यांना ‘शेल्फ लाईफ’ नसल्याने त्यांचे उत्पादन केल्यावर बाजारात भाव नसेल तर शेतकरी संकटात सापडतो. केळीसारख्या पिकांना बाजारात भाव नाही मिळाला तरी या पिकांना उत्पादना नंतरच्या प्रक्रिया उद्योगाला जोडले तर त्यातून नवा रोजगार उभा राहतोच शिवाय शेतमालाला हमीने चांगला भाव मिळतो आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थाचे ‘शेल्फ लाईफ’ असल्याने त्यांनाही बाजारात चांगला भावही मिळवता येतो. हे प्रमोदीनी मेतकर यांनी सिध्द केलं आहे.

Image may contain: food

अशी झाली सुरुवात
शिवणकामातून जमा केलेल्या केवळ पंधराशे रुपये रकमेतून व्यवसाय उभा केला. व्यवसायात स्वतः झोकून काम केले. मॉ जिजाऊ महिला बचत गटाच्या माध्यमातून उमेदीला बळ मिळाले. सकाळ तनिष्का गटाच्या एका प्रशिक्षणातून व्यवसायाची संकल्पना उभी राहीली. जवळपास एक लाख रुपयाच्या भांडवलातून उभारलेल्या व्यवसायाला तेल्हारा आणि अकोट परिसरात अल्पावधितच बळ मिळाले.

Image may contain: 2 people, people sitting
महिन्याला दहा क्विंटलपर्यंत उत्पादन
प्रमोदीनी मेतकर यांनी केळीपासून चिप्स, पीठ, पापड, आईस्क्रिम, केळी पिठाचे वेगवेगळे पदार्थ, शेव आदीपदार्थ तयार केले आहेत. त्यांना बाजारात चांगली मागणी आहे. यासाठी प्रत्येक महिन्याला जवळपास दहा क्विंटलपर्यंत माल तयार केला जात आहे. केळीला चांगला भाव मिळत नसल्याने प्रक्रियेव्दारे मुल्यवर्धन हा त्यावरचा चांगला पर्याय असल्याचे त्यामुळे स्पष्ट झाले आहे.
Image may contain: food
महिलांनाही रोजगार
घरगुती व्यवसायातून प्रमोदीनी मेतकर यांनी व्यवसाय वृध्दींगत करताना प्रिती सित्रे, दूर्गा मेतकर, अनुराधा सित्रे यांचा मोलाचा हातभार लागला. यासोबतच कामानुसार अनेक महिलांना त्या रोजगार उपलब्ध करून देतात.
Image may contain: 2 people, people standing
आरोग्यदायी आणि परवडणारेही
अगदी गोरगरीबांनाही आर्थिकदृष्ट्या परवडणारे केळी हे फळ आहे. ते एक उत्तम अन्न आहे. केळीमध्ये साखर, प्रथिने, स्निग्ध पदार्थ आहे. केळी हे पचायला सोपे फळ असून त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. केळामध्ये अ, ब, क जीवनसत्वे आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि जास्त या सुक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण अधिक असते. या गुणधर्ममुळे केळी हे अगदी कुपोषित लहान मुलांच्या प्रकृती सुधारण्यामध्येही एक आदर्श फळ म्हणून गणले गेलेले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Pramodini Metkar from Saudla in Telhara taluka has achieved financial well-being through banana processing industry.