अकोल्यात काँग्रेसतर्फे रास्ता रोको

युवक काँग्रेसही आक्रमक; राहुल गांधींच्या चौकशीचा नोंदविला निषेध
Akola Congress party workers road Block agitation
Akola Congress party workers road Block agitation sakal

अकोला : नॅशनल हेराल्ड प्रकरणी सलग तिसऱ्या दिवशी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची अंमलबजावणी संचालनायने (ईडी) दिल्लीत चौकशी केली. त्याचे पडसाद बुधवारी अकोला शहरात उमटले. काँग्रेसतर्फे मध्यवर्ती बस स्थानकासमोर असलेल्या मदनलाल धिंग्रा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यापाठोपाठ गांधी रोडवर खुले नाट्यगृहासमोर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून रास्ता रोको करीत निषेध नोंदविला.

केंद्रीय तपास यंत्रणांचा केंद्रातील मोदी सरकारकडून गैरवापर होत असल्याचा आरोप करीत काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला. नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून गत तीन दिवसांपासून राहुल गांधी यांची चौकशी होत आहे. या प्रकाराचा निषेध करीत दुपारी २ वाजता काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या स्वराज्य भवन येथे नेते व कार्यकर्ते जमले. काही वेळानंतर त्यांनी काँग्रेस मुख्यालया समोरच असलेल्या मदनलाल धिंग्रा चौकात जाऊन रास्ता रोको केला. या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मानवी साखळी करीत रास्ता रोको करून केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या वाहतुकीची कोंडी झाली होती. सिटी कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतले.

आंदोलकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. हे आंदोलन आटोपल्यानंतर दुपारी ३ वाजताच्या सुमारास युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गांधी रोडवर खुले नाट्यगृहापुढील चौकात रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. याठिकाणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गोल रिंगण करीत घोषणाबाजी केली व टायर टाळून निषेध नोंदविला. पोलिसांनी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.

वाहन चालकांचा पोलिसांशी वाद

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केल्याने अशोक वाटीका ते टावरकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती. वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांनी अन्य मार्गाने वाहतूक वळवली. यावेळी तीन ते चार वाहन चालक व पोलिस व आंदोकांमध्ये वाद झाला. आंदोलकांनी मदनलाल धिंग्रा चौकातून टावरकडे जाणारी वाहतूक रोखून धरली. त्याला वाहन चालकांनी विरोध केला होता.

जन सामान्यांच्या प्रश्नावर वेधणार लक्ष

बेरोजगारी, वाढत्या महागाईसह देशात अनेक प्रश्न दिवसेंदिवस उग्ररूप धारण करीत आहे. मात्र, जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकारला वेळ नाही. सरकार काँग्रेसच्या नेत्यांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई करून जनसामान्यांच्या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला. बेरोजगारीवर बोलणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून सरकार कारवाई करीत असल्याची टीका काँग्रेस नेत्यांनी केली. हे प्रकार बंद न झाल्यास काँग्रेस यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही नेत्यांनी यावेळी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com